Sangli Samachar

The Janshakti News

रावसाहेब पाटील (दादा) : सभेला सशक्त करणारा समाजनेता !


सांगली समाचार वृत्त |
दि. २४ जून २०२४

रावसाहेब अण्णासाहेब पाटील (दादा) बोरगाव, यांचे वयाच्या ८० वर्षी बेळगाव येथील अरिहंत हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना निधन झालं. दक्षिण भारत जैन सभेचा खमक्या अध्यक्ष काळाच्या पडद्याआड गेल्यानं अरिहंत परिवार, दक्षिण भारत जैन सभा व जैन समाज पोरका झाला .  

 उत्तर कर्नाटकातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सहकार आणि आर्थिक क्षेत्रात लक्षवेधी योगदान राहिलेले दादा म्हणजे डॅशिंग व्यक्तिमत्व होते. गेल्या १४ वर्षात सभेचा अध्यक्ष म्हणून त्यांची काम करण्याची पध्दत मी केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून जवळून पाहिली आहे. गेल्या दिड दशकात सभेची जी प्रगती झाली ती रावसाहेब दादांच्या दूरदृष्टीने झाली आहे. 

बोरगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सार्वजनिक कार्याला प्रारंभ केला. सहकारी संघाचे सदस्य म्हणून त्यांनी उठावदार कार्य केले. तालुका-मंडळाचे सदस्य आणि पंचगंगा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचे सदस्य म्हणून शेतकरी हित केले. . त्यांनी 'अरिहंत हालू उत्पादक सहकारी संघ (दूध डेअरी) आणि श्री अरिहंत विकास संस्था. 'श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी लि.' चे संस्थापक अध्यक्ष म्हणून कठोर संघर्ष करुन कर्नाटकातील सात जिल्ह्यांमध्ये २५ शाखांचे जाळे विणले. अरिहंत च्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली आहे. ही राज्यातील 'सर्वोत्कृष्ट सौहार्द सहकारी संस्था मानली जाते. ते 'कर्नाटक जैन असोसिएशन'वर निवडून गेले. आणि ६ कोटी रु. खर्चाच्या इमारत उभारणीतील त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे 

दादांनी एक 'श्रावक' म्हणून बोरगाव येथील जुन्या मंदिरांच्या जीर्णोद्धारात आणि 'स्तवनिधी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांना शिक्षण क्षेत्राबद्दल खूप आस्था होती. ते लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या आचार्य देशभूषण आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, बेडकिहाळ-शमनेवाडीच्या विकास समितीचे अध्यक्ष राहिले व मेडिकल कॉलेजचा चौफेर विकास करण्यासाठी चांगले मार्गदर्शन व सहयोग दिले आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरगावचे संस्थापक अध्यक्ष, बाहुबली कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, श्रावणबेळगोला' चे संचालक म्हणूनही त्यांचे काम महत्त्वाचे ठरते. 

त्यांची सहकार, सामाजिक-धार्मिक-शैक्षणिक विकासाची आवड लक्षात घेऊन प्रारंभी त्यांच्याकडे सभेच्या व्हा. चेअरमन पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ती उत्तम प्रकारे पार पाडून ते 'दक्षिण भारत जैन सभेच्या बोरगाव येथील ९१ व्या त्रैवार्षिक अधिवेशनात अध्यक्ष झाले. त्यानंतर त्यांनी संस्कार, शिक्षण व आरोग्य या त्रिसूत्री भर देऊन कार्य सुरु केले व त्यामध्ये यशस्वीही झाले. अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शिष्यवृत्तीचा निधी उभारण्यासाठी पन्नास लाखावरुन तीन कोटींचा करणार असल्याचे स्पष्ट केले.आणि ते करुनही दाखवले. त्यांच्या गेल्या १४ वर्षाच्या अध्यक्ष पदावरील कालात सभेचा कोटीच्या आत रेंगाळलेला फंड तीन कोटी पार झाला. समाजातील गोरगरीब हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बऱ्यापैकी सभेचा आर्थिक हातभार लागू लागला. याचे श्रेय दादांना द्यावे लागेल.दादांच्या या भरीव कार्यास आता जैन समाज भरभरुन प्रतिसाद देत आहे. शिक्षणप्रेमी दानशूर आता स्वतःहून निधी देत आहेत. 

सभेचे काम करताना दादांनी पदाधिकाऱ्यांची टिम मजबूत केली. दादांनी सभेच्या व शाखांच्या पदाधिकाऱ्यांना निर्णय स्वातंत्र्य आणि रचनात्मक कामास उचित मार्गदर्शन, प्रत्यक्ष सहयोग व प्रोत्साहन दिल्यानेच सभा प्रगती करु शकली हे वास्तव आहे. दादांनी लोकशाही मार्गाने काम करुन सहकाऱ्यांना प्रतिष्ठा दिली. एवढी मोठी कर्तबगारी असूनही त्यांना मोठेपणाचा गर्व नव्हता. पदाधिकाऱ्यांपासून शिपायापर्यंत सर्वांना ते मान द्यायचे. अहंकाराचा त्यांना कधीही स्पर्श झाला नाही. 

दादांच्या काळातच दक्षिण भारत जैन सभेचे कार्पोरेट लुकचे प्रशस्त मध्यवर्ती कार्यालय तयार झाले. हुबळी येथे कमर्शियल काॅम्पलेक्स झाले. धारवाड येथे हुडाकडून जागा मिळाली. सभेचे जन्मस्थान श्री क्षेत्र स्तवनिधी येथे भव्य ब्रम्हनाथ भवन निर्मिती आणि क्षेत्रावरील विघ्न दूर करुन तिला मोकळा श्वास घेण्याचा बंदोबस्त ही दादांचे ऐतिहासिक कामगिरी आहे. कोल्हापूर व सांगली येथील बोर्डिंग, वीर महिला मंडळ (जयसिंगपूर) व महिला श्रमाच्या अद्यावत इमारती उभ्या राहिल्या. बेळगांव येथे प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांचे स्मारक व निशिदी अशी विविध सुमारे ५कोटींची कामे पूर्ण झाली.सभेचा चौदा वर्षापूर्वी दहा कोटी असलेला ताळेबंद पस्तीस कोटीचा झाला. सभा व शाखा आर्थिक दृष्ट्या सबळ झाल्या. जैन समाजाला त्यांच्या रुपात सक्षम नेतृत्व लाभल्यानेच हे शक्य झाले. दादांना कर्नाटक सरकार सहकारचा सहकार रत्न हा सर्वोच्च पुरस्कार दिला. समाजभूषण, समाजरत्न पुरस्काराने ते सन्मानित झाले. 

दादांनी सभा व शाखांचे उत्पन्न वाढविण्यासाठी योजना यशस्वी केल्या. वीर सेवा दल आणि पदवीधर संघटना, वीर महिला मंडळ व सभेच्या अन्य शाखांच्या माध्यमातून दादांनी समाजात समन्वय रहावा, ऐक्य वृध्दीगंत व्हावे यासाठी कायम प्रयत्न केले. सभेच्या शंभराव्या अधिवेशनात जैन समाजाच्या प्रश्नावर ठराव करुन शासनास सादर करुन दादांनी समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकास पोहचला पाहिजे यासाठी परिश्रम घेतले. 

जैन साधू - साध्वी, भट्टारक पट्टाचार्य पिठं, तीर्थक्षेत्रे, जिनमंदीरे यांच्या विषयी त्यांच्या मनात खूप आदर होता. समाजातील महिला आणि युवा वर्ग यांचे कल्याण व बालकांवर सुसंस्कार या कामी त्यांनी सभेला समाजाला भरभरुन कोट्यवधींचे दानही दिले आहे. जैन समाजाची शेती, व्यापार /उद्योग, शिक्षण व आरोग्य चांगले रहावे यासाठी ते कायम सडेतोड मतं मांडत. देवालयं सिमीत ठेवून विद्यालयं वाढवा हा त्यांचा आग्रह होता. उच्च नीच भेदभाव करु नका.. सभेच्या एकाच छताखाली येऊन प्रगती साध्य करा असे ते ठासून सांगत. अंधश्रद्धेपासून दूर रहा. जैन समाज वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जगला पाहिजे. हे कायम सांगणारे दादा सर्वांना बरोबर घेऊन सभेचे कामकाज करत त्यामुळे सभेची समाजाशी कनेक्टिव्हिटी मजबूत झाली आहे. दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला कामाची संधी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो.दक्षिण भारत जैन सभेचे काम अधिक जोमाने करणे हीच दादांनी खरी श्रद्धांजली होय. दादांच्या आत्म्यास चिरशांती व सदगती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 

भालचंद्र विरेंद्र पाटील
केंद्रीय उपाध्यक्ष, 
दक्षिण भारत जैन सभा.