Sangli Samachar

The Janshakti News

संसदेत नखरे, गोंधळ नको; पंतप्रधानांनी विरोधकांना सुनावले !


सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - २४ जून २०२४
'सरकार चालविण्यासाठी बहुमत असले तरी देश चालविण्यासाठी सहमतीची आवश्यकता असल्याने सर्वांना सोबत घेऊन आपण पुढे जाऊ,' अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिली. जनतेला विरोधी पक्षांकडून नखरे, नाटक, गोंधळाची नव्हे तर ठोस कामकाजाची अपेक्षा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, आणीबाणीला उद्या (ता. २५) ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पंतप्रधानांनी नाव न घेता काँग्रेसवर सूचक शब्दांत हल्ला चढविला. भारतीय लोकशाहीवर २५ जूनला कलंक लागला होता. पुन्हा असे करण्याची हिंमत भारतात कोणीही करणार नाही असा संकल्प देशवासीय घेतील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

दरम्यान आज संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी संविधान बचाओचा नारा बुलंद केला. पंतप्रधान मोदी यांच्यासह त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि विरोधी नेते, खासदारांनी संसद सदस्यत्वाची शपथ घेतली. मोदी शपथ घेत असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना राज्यघटनेची प्रत उंचावून दाखविली.


नव्या सरकारच्या स्थापनेसोबत अस्तित्वात आलेल्या अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या विशेष अधिवेशनात हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना संसद सदस्यत्वाची शपथ दिली. तत्पूर्वी, प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नव्या खासदारांचे स्वागत केले. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू, राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल, एल. मुरुगन आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यावेळी उपस्थित होते.

जबाबदारी वाढली

नव्या खासदारांचे स्वागत करताना स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा एखाद्या सरकारला सलग तिसऱ्यांदा सेवा करण्याची जनतेने संधी दिली असल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला. सरकारच्या ध्येय धोरणावर, समर्पण भावनेवर जनतेने पसंतीची मोहोर उमटविली असल्याचा दावा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की 'आपली जबाबदारी देखील यामुळे तिपटीने वाढली असून तिसऱ्या कार्यकाळात पहिल्या दोन कार्यकाळांपेक्षा अधिक मेहनत करू. सरकार चालविण्यासाठी बहुमत आवश्यक असते याची जाणीव आहे. परंतु परंतु देश चालविण्यासाठी सहमतीची आवश्यकता असते त्यामुळे आमचा प्रयत्न असेल की सर्वांच्या सहमतीने, सर्वांना सोबत घेऊन भारत मातेची सेवा करू.'

आणीबाणी हा काळा डाग

आणीबाणीच्या ५० व्या स्मृतीदिनाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले. ते म्हणाले, की 'या दिवशी भारतीय लोकशाहीवर जो काळा डाग लागला होता. त्यास ५० वर्षे पूर्ण होत आहेत. देशाचे संविधान नाकारले होते आणि संविधानाच्या चिंधड्या उडविल्या होत्या. ही गोष्ट भारताची नवीन पिढी कधीही विसरणार नाही. संपूर्ण देश तुरुंग बनला होता. आणीबाणीचे पन्नासावे वर्ष हे संविधानाच्या संरक्षणाचे, भारतीय लोकशाही आणि लोकशाही परंपरांच्या संरक्षणाचे असून भविष्यात कोणीही अशी हिंमत करणार नाही यासाठी संकल्प घेण्याचे आहे.'

लोकशाहीची प्रतिष्ठा टिकवा

पंतप्रधान मोदी म्हणाले, 'अठराव्या लोकसभेत विरोधी पक्षांकडून चांगल्या भूमिकेची, लोकशाहीची प्रतिष्ठा टिकविण्याची अपेक्षा देश बाळगतो. सर्वसामान्यांची अपेक्षा असते की संसदेत चर्चा व्हावी, सरकारवर देखरेख ठेवली जावी. नखरे, नाटकबाजी आणि अडथळे जनतेला अपेक्षित नाहीत. लोकांना ठोस कामकाज हवे आहे. घोषणाबाजी नको. देशाला चांगल्या आणि जबाबदार विरोधी पक्षाची अपेक्षा आहे. अठराव्या लोकसभेमध्ये आपले खासदार सर्वसामान्यांच्या या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.'

पारंपरिक भाषण करताना पंतप्रधान मोदी गरजेपेक्षा जास्त बोलले आहेत. सुंभ जळला तरी पीळ गेला नाही असा हा प्रकार आहे. मोदी ५० वर्षांपूर्वीच्या आणीबाणीची आठवण करून देत आहेत. परंतु जनतेने संपुष्टात आणलेली मागील दहा वर्षांची अघोषित आणीबाणी ते विसरले आहेत. जनतेने मोदींच्या विरुद्ध जनादेश दिला आहे असे असूनही ते पंतप्रधान झाले आहेत तर त्यांनी काम करावे. जनतेला घोषणाबाजी नको, काम हवे हे त्यांनी लक्षात ठेवावे, लक्ष्मण खर्गे यांनी म्हटले आहे.