Sangli Samachar

The Janshakti News

संभाव्य पार्किंगवरील मालमत्ता कर तात्काळ रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन - पृथ्वीराज पाटील
| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जून २०२४
महापालिका हद्दीत घरे, इमारती, सदनिकांतील पार्किंगसाठी वापरात असलेल्या जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय प्रशासकीय महासभेत घेण्यात आला आहे. हा निर्णय म्हणजे नागरिकांवर अत्‍याचार आहे. इंग्रज राजवटीपेक्षा जाचक ‘लगान’ वसूल करण्याचा प्रशासनाचा डाव दिसतोय. तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हा निर्णय तातडीने मागे घ्या, अन्यथा काँग्रेस थेट रस्त्यावर उथरून याला विरोध करेल, असा इशारा सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना आज दिला.

पृथ्वीराजबाबा पाटील यांनी आयुक्त श्री. गुप्ता यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर महापालिकेच्या निर्णयाचा पंचनामा केला. प्रशासकीय काळात विकासाला गती देण्याची अपेक्षा असताना लोकांच्या डोक्यावर नवे कर लादण्याची भूमिका कशासाठी घेतली जात आहे, असा सवाल त्यांनी केला. पृथ्वीराजबाबा पाटील म्हणाले की, सध्या महापालिका बाह्य एजन्सी द्वारा मालमत्ता सर्वेक्षण करत आहे. त्यामुळे महापालिका उत्पन्नात वाढ होणार आहे. त्याचे स्वागत आहे, त्यात पार्किंग जागेवर मालमत्ता कर आकारणीचा निर्णय कशासाठी घेताय? 


जनतेचा खिसा आधीच फाटलेला आहे. तो पुन्हा ओरबडण्याचे कारस्थान रचू नका. पार्किंग स्वतःच्या जागेत करुन नागरिकांनी वाहतूक नियमनाच्या दृष्टीने महापालिकेला मदत केली आहे. मालमत्ता कर आकारण्याऐवजी त्यांना उलट मालमत्ता करात ५ ते १० टक्के कर सवलत देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे. त्याउलट आपली भूमिका दिसते आहे. हा अन्यायकारक ठराव तातडीने रद्द करा. अन्यथा, सांगलीकरांना सोबत घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरेल.’’

यावेळी अजय देशमुख, प्रशांत देशमुख, रविंद्र वळवडे, प्रा. एन. डी. बिरनाळे, सुनिल मोहिते, आनंदा लिगाडे, समाधान कांबळे, दिनेश थोरात, रोहन अवडणकर, सौरभ चव्हाण, योगेश आपटे, अक्षय जाधव, शुभम मांडवकर, हुसेन इनामदार, प्रकाश गावडे अनिता अवडणकर व वनिता पटेल उपस्थित होते.