Sangli Samachar

The Janshakti News

अजितदादांच्या वर्चस्वाला धक्का देण्याची तयारी ?


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ११ जून २०२४
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी शरद पवार यांची साथ सोडत महायुतीत आपली वेगळी चूल मांडली. पहिल्यापासूनच अजित पवारांचा सरकारमध्ये आणि प्रशासनावर नेहमीच दरारा राहिला आहे. या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना एकच सीट निवडून आणता आली आहे. अजित पवारांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे म्हणूनच की काय अजित पवार महायुतीत गेल्यावर लगेच त्यांना पुण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा, विशेषत: अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीनं पुण्यात कायम ताकद राखली आहे.

अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत युती सरकारमध्ये एन्ट्री घेतली. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला स्थान देण्यात आलेले नाही. परंतु नगरसेवक, महापौर असा चढता प्रवास केलेले मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मंत्री करण्यात येणार आहे ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.


मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात येतंय. त्या माध्यमातून त्यांच्या मागे भाजप ताकद उभी करत असल्याची चर्चा पुण्यात दबक्या आवाजात सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत दादांना बसलेल्या धक्क्यांमुळे पुण्यातील राजकीय गणितं बदलली आहेत. त्यामुळे अजित पवारांचं पालकमंत्री राहणार का, अशा चर्चा सुरु असताना मोहोळ यांची मंत्रिपदासाठी झालेली निवड राष्ट्रवादीची चिंता वाढवणारी आहे.

अगोदरच शरद पवारांची सोडलेली साथ, कुटुंबीय विरोधात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत म्हणावे असे यश मिळाले नाही.
याअगोदर आपला मुलगा आणि यंदा आपल्या पत्नीलाही त्यांना निवडून आणता आले नाही,
सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसला डावलण्यात आले आहे मोहोळ यांना देण्यात आलेल्या मंत्रिपदाचा विधानसभेत भाजपला अधिकचा फायदा होणार आहे. त्यामुळे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यात अजित पवारांचा दरारा राहणार का ? अशीही कुजबुज सध्या सुरु आहे.