yuva MAharashtra 'म्हणून' मुस्लिम दाम्पत्याने नवजात बालिकेचे 'महालक्ष्मी' असे केले नामकरण !

'म्हणून' मुस्लिम दाम्पत्याने नवजात बालिकेचे 'महालक्ष्मी' असे केले नामकरण !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ जून २०२४
धावत्या ट्रेनमध्ये एका मुस्लिम महिलेने नवजात बालिकेला जन्म दिला. ज्या ट्रेनमध्ये ही दांपत्य प्रवास करत होते. ती ट्रेन होती महालक्ष्मी एक्सप्रेस ! या रेल्वेच्या नावावरूनच आता या दाम्पत्याने आपल्या नवजात बालिकेचे महालक्ष्मी असे नामकरण करून धर्माधर्मात भांडणे लावणा-यांना आणि भांडणे करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.

मिरा रोड मुंबई येथील खातून दांपत्य कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने महालक्ष्मी एक्सप्रेसने, सहा जून रोजी प्रवास करत होते. फातिमा खातून यांचे बाळंतपण जवळ आले होते. डॉक्टरांनी २० जून ही तारीख दिली होती. त्यामुळे दोघे मुंबईच्या दिशेने महालक्ष्मी एक्सप्रेसने जात होते.

रात्री अकराच्या सुमारास फातिमा यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यांनी शौचालयाकडे धाव घेतली. बराच वेळ त्या न आल्याने पती तेथे गेले. तेव्हा फातिमा यांनी एका नवजात बालिकेला जन्म दिल्याचे दिसून आले.


रेल्वे प्रवासादरम्यान फातिमा यांची एकूण प्रकृती पाहून सहप्रवासी महिलांनी काय काळजी घ्यायची याबाबत सांगितले. त्याचप्रमाणे महालक्ष्मी एक्सप्रेस, ही गाडी कशी लकी आहे, महालक्ष्मीचे नाव, तिचे संस्कृतीत असलेले महत्त्व याबाबत चर्चा केल्या होत्या. त्यामुळे तय्यब यांनी एक धाडसी परंतु वेगळा निर्णय घेतला. ज्या रेल्वेने प्रवास करत होते, त्या रेल्वेचे नाव महालक्ष्मी एक्सप्रेस आहे. त्यामुळे आपण नवजात बालिकेचे नाव महालक्ष्मी असेच ठेवणार असल्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसा जाहीर केला. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत होते.