Sangli Samachar

The Janshakti News

"भाजपला सुरुवातीला RSSची गरज होती, पण आता पक्षाची क्षमता वाढली"; संघ-भाजप संबंधांवर जेपी नड्डांचे विधान !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १९ मे २०२४
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना एका मुलाखतीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत (RSS) केलेले विधान चांगलेच चर्चेत आले आहे. सुरुवातीला भाजपला संघाची गरज होती. आता आम्ही सक्षम झालो आहोत. भाजप स्वत:च्या बळावर चालते. संघ ही वैचारिक आघाडी आहे, असे विधान जेपी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले जे.पी.नड्डा ?

‘माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असताना पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. त्यावेळी भाजपची क्षमता कमी होती. आता आमची क्षमता वाढली आहे. आम्ही आता आधीपेक्षा सक्षम झालो आहोत. भाजप आता स्वत:च स्वत:ला चालवू शकतो. भाजप आता मोठा झाला आहे. या पक्षातील नेते कर्तव्य आणि भूमिका निभावत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामजिक संघटना आहे. तर भाजप हा राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ वैचारिक पातळीवर काम करते,” असेही ते म्हणाले.

“प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची, भूमिकांची कल्पना, जाणीव आहे. संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही एक राजकीय पक्ष आहोत. त्यामुळे गरजेचा प्रश्न नाही. संघ ही वैचारिक आघाडी आहे. ते वैचारिक भूमिकेनुसार त्यांचं काम करतात. आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो आणि राजकीय पक्षाला हे करायलाच पाहिजे,” असेही नड्डा म्हणाले.

काशी आणि मथुरेबाबत जे.पी.नड्डा यांचे खळबळजनक भाष्य

यावेळी जे.पी.नड्डा यांनी काशी आणि मथुरेतील वादग्रस्त ठिकाणी मंदिर उभारण्याचा आमचा कुठलाही प्लॅन नसल्याचेही स्पष्ट केले. सध्या पक्षाचा फोकस हा महिला, दलित, गरिब आणि तरुणांचा विकास करण्यावर आहे, हे स्वत: मोदींनी ठरवलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

यादरम्यान योगी आदित्यनाथ आणि हिमंता बिश्व शर्मांसारखे नेते काशी, मथुरेचा उल्लेख करतात याची आठवण नड्डा यांना करून दिला. तेव्हा राम मंदिर प्रत्यक्षात उभारण्यात आल्याने काही नेते भावूक होतात आणि भावनेच्या भरात बोलून जातात, असं उत्तरही जेपी नड्डा यांनी दिले.

दरम्यान, देशभरात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. सात टप्प्यांपैकी आतापर्यंत चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर येत्या 20 मे रोजी सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यादरम्यान जेपी नड्डा यांनी RSS आणि भाजपच्या संबंधाबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे.