Sangli Samachar

The Janshakti News

डॉ. हेमाताई चौधरी व डॉ. सार्थक पाटील यांचे अवयवदान प्रबोधनाचे कार्य कौतुकास्पद !



शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली व्यक्ती अनेकांच्या पाहण्यात येत असते. जीवनातील शेवटची घटका मोजत असलेले असे हजारो रुग्ण आपल्या आसपास आहेत की, ज्यांच्या डोळ्यांदेखत अवयव देऊ करणारा दाता दिसत असूनही त्यांना त्यांचे प्राण वाचविता येत नाहीत. लोकसंखेच्या बाबतीत जगात पहिला असणारा एकशे चाळीस कोटींचा भारत देश अवयावदानात मात्र जगात शेवटून दुसरा असावा ही एक शोकांतिका म्हणता येईल. ही वस्तुस्थिती दूर व्हावी या उद्देशाने देशात अनेक व्यक्ती व संस्था अवयवदान या विषयात झटून कार्यरत आहेत. मात्र त्यांचे कार्य एकसंध व्हावे, त्यांना त्यांच्या कार्यात येणाऱ्या सरकारी तसेच इतर प्रकारच्या अडचणी दूर व्हाव्यात, अवयवदान व देहदान या संदर्भातील लोकप्रबोधनाच्या कामाला मोठी चालना मिळावी याकरिता या सर्व लहान-मोठ्या संस्था एका धाग्याने बांधून या चळवळीला व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशन या संस्थेने महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर देश पातळीवरही सुरू केला आहे. फेडरेशनची १७ मे २०१५ रोजी स्थापना करण्यात आली आणि २०१७ मध्ये, बरोबर दोन वर्षांनी १७ मे रोजीच फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशन, मुंबई या नावे ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदविली गेली.

ठाणे जिल्ह्यातील वसईसारख्या विकसित भागात आपल्या “देहमुक्ती मिशन” या संस्थेच्या माध्यमातून अवयव व देहदान या क्षेत्रात अनेक वर्षे काम करणारे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांना, त्यांना आलेल्या प्रदीर्घ अनुभवातून, एका व्यापक संस्थेची म्हणजेच महासंघाची निकड भासू लागली होती. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आणि त्यांच्या दूरदर्शी प्रयत्नांमुळे ‘दि फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲण्ड बॉडी डोनेशन’ ही संस्था स्थापन झाली.

रक्तदान याविषयी जनमानसात चांगल्या प्रकारे प्रबोधन झालेले आहे. त्यामुळे रक्तदानासाठी स्वतः होऊन पुढे येणारे दाते आज उपलब्ध होत असतात. विविध मंडळे, सामाजिक, राजकीय संस्थांकडून रक्तदानाचे कार्य बऱ्यापैकी सुरू आहे; परंतु नेत्रदान, त्वचादान, अवयवदान, देहदान करण्याची एखाद्या व्यक्तीची इच्छा असूनदेखील प्रत्यक्षात ते करण्याची वेळ येते, त्यावेळी ती व्यक्ती तेथे हयात नसते. तर तिथे असते त्याचे मृत शरीर. अशा वेळी त्याच्या जवळच्या नातेवाइकांची, कुटुंबातील व्यक्तींची भूमिका महत्त्वाची ठरते. अशा अत्यंत हळव्या किंवा भावनोद्दीपक अवस्थेत मृताच्या आप्तजनांना अवयव वा देहदानाची जाणीव करून देणे हे मोठे संयमाचे व जोखमीचे काम असते. अशातही जनजागृती करणाऱ्या अनेक व्यक्ती व सामाजिक संस्था सर्वस्व झोकून काम करत आहेत.

आपापल्या कक्षेत काम करताना त्यांना विविध अडचणी येतात; त्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांचे प्रयत्न देखील अपुरे पडतात. फेडरेशनचे संस्थापक पुरुषोत्तम पवार यांनी चळवळीची ही अडचण अनुभवली होती. त्यामुळे त्यांनी अनेक व्यक्ती व संस्थांच्या प्रमुखांना वारंवार भेटून या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी आपण एकत्र येणे कसे गरजेचे आहे हे समजावून सांगितले. तसेच पुढाकार घेत मुंबई येथे सर जे. जे. हॉस्पिटलमध्ये देहदानाचे कार्य करणाऱ्या सर्व सामाजिक संस्थांची बैठक बोलावली आणि एकमुखाने महासंघाची मुहूर्तमेढ रोवली. फेडरेशनच्या छत्राखाली सर्व स्थानिक संस्थांनी एकत्र येऊन एकमेकांशी समन्वय साधत कार्य सुरू केल्याचे अनेक फायदे दिसू लागले.

केवळ मुंबई शहर आणि उपनगरे यांच्यापर्यंतच संगठन मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर हे कार्य विस्तारण्याच्या दृष्टीने राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांशी संपर्क साधत कार्याची घोडदौड चालू ठेवली आहे. फेडरेशनची स्थापना करताना आरोग्य क्षेत्रात मोठी रुग्णसेवा देणारे हरकचंदजी सावला यांना प्रथम अध्यक्षपदाचा मान दिला गेला, तर संस्थापक पुरुषोत्तम पवार यांच्या बरोबरीने सुधीर बागाईतकर, विनोद हरिया, कुलीनकांत जी लुठीया, विनायक जोशी आदींप्रमाणेच दधीची देहदान समिती, मानव ज्योत, जीवन ज्योत, सुमती ग्रुप अशा प्रस्थापित सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी देखील फेडरेशनच्या उभारणीत मोलाचा भार उचलला.

कार्यकर्ते नेटाने कामाला लागले. महाराष्ट्रातील सर्व सक्रिय कार्यकर्त्यांना एका मंचावर आणून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी २०१६ मध्ये महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, मुंबई येथे अवयवदान क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन यशस्वी रीतीने आयोजित केले गेले. त्यापासून या कामात महाराष्ट्र सेवा संघाचे अनमोल सहाय्य लाभले ते आजतागायत. या अधिवेशनात सुप्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉक्टर वत्सला त्रिवेदी, तसेच डॉक्टर प्रवीण शिनगारे, नागपूरचे चंद्रकांत मेहेर आदी अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. भारतात ज्यांच्यावर २००३ मध्ये पहिले यशस्वी यकृत प्रत्यारोपण झाले होते, असे नाशिक येथील डॉ. भाऊसाहेब मोरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. संमेलनाच्या या यशानंतर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे कार्यकर्ते फेडरेशनशी जोडले गेले आहेत.

अवयवदान प्रबोधनाचा झेंडा रोवताना फेडरेशनच्या कार्याचा ठसा उमटवला गेला. छोट्या छोट्या गावातून आणि मोठ्या शहरात असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना फेडरेशनच्या कार्यामध्ये सहभागी करण्यात आले. महासंघ राज्यभर बहरला. दरम्यान लॉकडाऊन सुरू झाला. अवयवदान क्षेत्र अधिक संवेदनशील असल्यामुळे या कार्याला शंभर टक्के कोरोनाची खीळ बसली. अवयवदानाची चळवळ ठप्प झाली असे वाटत असतानाच, फेडरेशनने झूम मीटिंग, गुगलमीट व बेबीनार अशा अनेक ऑनलाइन कार्यक्रमांचा सपाटा चालूच ठेवत चळवळ जागती ठेवली, बोलती ठेवली. फेडरेशनचे हे कार्य असेच यशस्वीपणे पुढे पुढेच आपण नेणार आहोत, असा आत्मविश्वास आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या रोमारोमात तयार झालेला आहे.

सध्या सांगली जिल्ह्यात डॉक्टर हेमा शीतल चौधरी व डॉक्टर सार्थक आणि पाटील हे प्रबोधनाचे कार्य अतिशय जोमाने-नेटाने सुरू ठेवले आहे. सुदैवाने त्यांच्या कार्याला चांगल्या प्रकारे यशही येत आहे. आपले दैनंदिन व्यवहारी व प्रापंचिक कर्तव्य सांभाळत, ही जोडगोळी शहराबरोबरच ग्रामीण भागातही पायाला भिंगरी बांधून प्रचार कार्य करीत आहे. समाजभान असलेल्या अनेक संस्था डॉक्टर चौधरी व डॉक्टर पाटील यांच्या प्रबोधनात्मक कार्याला सकारात्मक प्रतिसाद देताना दिसत आहे. परिणामी त्यांच्या कार्याला मूर्त स्वरूप येत आहे. सध्याचा प्रत्यक्ष अवयवदान संख्यात्मक पेक्षा गुणात्मक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रयत्नाने अनेक गरजवंतांना याचा अतिशय चांगला फायदा झाला आहे. या सर्वच मंडळींचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. भविष्यात त्यांचे हे कार्य अधिकाधिक गुणात्मक व संख्यात्मक दृष्ट्या आकाशाला गवसणी ठरावे ही शुभेच्छा !