Sangli Samachar

The Janshakti News

'त्या' अधिकाऱ्याची वृत्ती, 'गरज सरो वैद्य मरो !'...



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ मे २०२४
व्यक्तिच्या आयुष्यात कुटुंब हा अत्यंत महत्वाचा घटक मानला गेला आहे. मानव उत्क्रांतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत असताना ‍समूहाने राहण्याची गरज त्याच्या मनात निर्माण झाली. भावनांचे आदान-प्रदान करण्यासाठी मानव समुहाने राहू लागला आणि त्यालाच 'कुटुंब' हे नामाभिधान मिळाले.

परंतु कुटुंबाचे परिघ ओलांडून विविध कारणांनी व्यक्ती समाजात मिसळते तेव्हा समाजातील अनेकविध प्रवृत्तींशी जुळवून घेताना खरा कस लागतो. आपण ज्या पद्धत‍ीने समाजाला आपलसं करु तसाच प्रतिसाद आपल्यालाही मिळतो. मनातील भावनांचे विचारांचे आदानप्रदान कर‍ताना समाजाशी आपले नाते अधिक दृढ होत जाते. कुटुंब संस्थेचे व्यापक स्वरुप म्हणजेच समाज संस्था. आणि यातूनच "वसुधैव कुटुंबकम्" ही संकल्पना उदयास आली.

परंतु या सार्‍या व्यवस्थेला छेद देत *"मी आणि माझे"* मनोवृत्तीच्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला आढळून येतात. अर्थात जोपर्यंत अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येत नाही, तोपर्यंत आपणअशा कोत्या मनोवृत्तीबद्दल नाराजी व्यक्त करून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते, त्यावेळी नाहक मनस्ताप सोसावा लागतो. विशेषतः ज्यावेळी आपण एखाद्याला याच 'वसुधैव कुटुंबकम' भावनेतून कुटुंबातील सदस्य म्हणून मदत केल्यानंतर, आपल्या गरजेच्या वेळी ती व्यक्ती जर उपयोगी पडली नाही, तर होणारा मनस्ताप शब्दातीत असतो. असाच प्रसंग एका सुह्रदयी शिक्षकाच्या वाट्याला आला.

शिक्षक म्हणजे देशाच्या भावी पिढीतून नवा समाज घडविणारा एक असाधारण कलाकार. आपल्या हातून उत्तम विद्यार्थी घडावा अशी उदात्त भावना ठेवून, कार्यरत असताना स्वतःही आपल्या जीवनात हीच तत्व अंगीकारणारा घटक... (नियमाला अपवाद असावा...) हेच तत्व अंगीकारणारा पापभिरु शिक्षक... हे ज्या तालुक्यात कार्यरत होते, त्या तालुक्यात अन्य जिल्ह्यातून एक अधिकारी बदली होऊन येणार होते. पूर्वी या तालुक्यात कार्यरत असणाऱ्या एका ओळखीच्या अधिकाऱ्याने या शिक्षकांना फोन करून सांगितले, " नव्या साहेबांना सहकार्य करा." येणा-या साहेबांना संपर्क केला असता, ते एकटेच ड्युटीवर येणार असल्याचे समजले.

तो काळ कोरोनाचा. सारे जग या नव्या संकटाने एकमेकांकडे संशयाने पाहणारा. त्यामुळे कुणी नवी व्यक्ती संपर्कात आली तर त्याच्यापासून चार हात लांब राहण्याकडे प्रत्येकाचा कल. अशा वेळेस या साहेबांना राहण्यासाठी भाड्याने घर कोण देणार ? त्यामुळे तालुक्याच्या तत्कालीन सभापती महोदयांना परिस्थितीची जाणीव करून देऊन तालुक्याचे रेस्ट हाऊसवर तात्पुरती व्यवस्था करावी अशी विनंती केली. या शिक्षकाच्या परोपकारी वृत्तीची जाणीव असल्याने, त्यांच्या विनंतीस मान देऊन साहेबांना गेस्ट हाऊसवर सोय करण्यात आली.

राहण्याची सोय झाली पण जेवणाचे काय ? तेव्हा या शिक्षक महोदयांनी जवळ जवळ सहा महिने स्वतःच्या घरातून जेवणाचा डबा पोहोच केला. तो सुध्दा विना मोबदला. सदरचे साहेबांचे कुटुंब दुसऱ्या जिल्ह्यात राहात असल्याने, त्यांच्याकडे जाण्यासाठी, कोरोनामुळे त्या वेळच्या नियमाप्रमाणे पास काढावा लागायचा. तो ही ओळखीच्या माध्यमातून अनेक वेळा काढून दिला. याचप्रमाणे अनेक वेळा अनेक प्रसंगी मदत केली. निस्वार्थ भावनेने.

काही दिवसापूर्वी या शिक्षकांना, संबंधित साहेब ज्या जिल्ह्यात कार्यरत होते, तेथील तालुक्याच्या ठिकाणी एका मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी यायचे होते. सदरचा दवाखाना प्रख्यात असल्यामुळे येथे रुग्णांची संख्या मोठी. सकाळी नंबर लावला तर दुपारी डॉक्टरांना भेटायला मिळायचे. आणि म्हणून वेळ वाचावा, उपचार लवकर व्हावा यासाठी या शिक्षकांनी संबंधित साहेबांना फोनवरून विनंती केली की, 'आपल्या ओळखीने दवाखान्यात लवकर उपचार मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.' अपेक्षा चुकीची नव्हती. कारण लवकर उपचार घेऊन पुन्हा कामाच्या ठिकाणी हजर व्हायचे होते. परंतु ज्यांच्यावर उपकार केले त्या साहेबांनी, 'माझी या ठिकाणी ओळख नाही' असे सांगून फोन कट केला.

वास्तविक काम अवघड नव्हते. अशक्य तर मुळीच नव्हते. पण... तेव्हा या शिक्षकांनी सदरची घटना याच जिल्ह्यातील ओळखीच्या ज्येष्ठ पत्रकारास सांगून, 'तुमच्या जिल्ह्यातील लोक असे कसे काय ?' अशी नाराजी व्यक्त केली. किंवा सदर गेस्ट पत्रकाराने नम्रपणे सांगितले की, शितावरून भाताची परीक्षा करू नका. साऱ्याच व्यक्ती अशा नसतात. तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः तिथे येतो व आपण प्रयत्न करू. तेव्हा सदर शिक्षकाने, या पत्रकारांचे आभार मानून सांगितले की, 'तुमच्या घरापासून हे ठिकाण 40 किलोमीटर आहे. तुम्ही त्रास घेऊ नका मी पाहतो.'

यथावकाश सदर डॉक्टरांचे भेट झाली, उपचार ही झाले. सदर शिक्षक आपल्या गावी आल्यानंतर, हा प्रसंग, ज्यांनी या साहेबांना मदत केली होती त्या,तालुक्याच्या सभापतींना सांगितला... मग त्यांनी म्हटले ज्यांच्या नावातच 'मोह'(न) आहे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ? त्यांच्या मनाची कवाड कशी उघडी होणार ?

या प्रसंगानंतर, सदर शिक्षकांना अन्य अडचणीत असणाऱ्यांना मदत करण्याची भावना होऊ शकेल का हो ?