Sangli Samachar

The Janshakti News

लातूरनंतर सांगलीत पाणीप्रश्न पेटला! रोहित पाटील यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ मे २०२४
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लातूरनंतर आता सांगली जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटला आहे. तासगाव तालुक्यातल्या बिरणवाडी फाटा या ठिकाणी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत पाण्यासाठी आंदोलन केलं असून पोलिसांनी काही शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित आरआर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. परिणामी परिस्थिती चिघळण्याची चिन्ह निर्माण झालं आहे.

आमच्यावरही गुन्हे दाखल करा : रोहित पाटील

पाण्यासाठी बिरणवाडी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्याकडून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या कारवाईला रोहित पाटील यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करावा ही भूमिका घेऊन रोहित पाटील पोलीस ठाण्यामध्येच ठाण मांडून आहेत. सावळजसह परिसरातील शेतकऱ्यांनी पुणदी सिंचन योजनेतून पाणी मिळावे या मागणीसाठी केलं रस्ता रोको आंदोलन होतं. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रोहित पाटील थेट पोलीस ठाण्यात आले.


नेमकं काय घडलं?

तासगाव तालुक्यातील सावळजसह परिसरामध्ये ताकारी सिंचन योजनेच्या पुनदी योजनेतुन पाणी मिळावं; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र पाटबंधारे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आज रस्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलन करणारे शेतकरी आणि पोलिसांमध्ये यावेळी जोरदार वादावादीचा आणि झटपटीचा प्रकार देखील घडला आहे. शेतकरी संतप्त असल्याने आपल्या आंदोलनावर ठाम होते. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.