| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ मे २०२४
देशात लव्ह जिहादच्या नावाने हिंदू युवतींची फसवणूक करुन त्यांचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र सुरु आहे. याला लाखो युवती बळी पडल्या आहेत. उत्तरप्रदेशमध्ये योगी सत्तेवर आल्यापासून लव्ह जिहाद करणाऱ्याच्या घरावर बुलडोझर चालविण्यास तेथील सरकारने सुरु केले आहे. त्याचेच अनुकरण महाराष्ट्राने करावे असे आवाहन हैद्राबादचे आमदार टायगर राजासिंह यांनी केले.
लव्ह जिहादला बळी पडलेल्या कर्नाटक येथील नेहा हिरेमठ आणि मुंबई येथील पुनम क्षीरसागर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी सांगलीत मोर्चा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सांगली बसस्थानकापासून मार्चास प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा राम मंदिर चौकात आल्यावर जाहीर सभा घेण्यात आली.
आ. राजासिंह म्हणाले, हिंदू राजकीय नेत्यांनी मतांचे राजकारण बंद करावे.
हिंदूंची लोकसंख्या आठ टक्कयांनी कमी झाल्याची शासकीय आकडेवारी प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे खडबडून जागे होण्याची वेळ आहे. पाकिस्तानात सध्या केवळ १ टक्के हिंदू शिल्लक आहे. बाकींच्यांचे धर्मांतर करण्यात आले आहे. तिसऱ्यांदा मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्यांनी, लोकसंख्या नियंत्रण आणि समान नागरी कायदा करावा यासाठी आम्ही संघटितपणे मागणी करणार आहोत. हिंदूनी आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी आठवड्यातून एक तास काढणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने लव्ह जिहादचा कायदा करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे आ. राजासिंह यांनी सांगितले.