Sangli Samachar

The Janshakti News

गणेश तलावाचे पावित्र्य धोक्यात मिरज सुधार समिती आंदोलनाच्या तयारीत !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ मे २०२४
मिरज शहरातील गणेश तलावाच्या पायर्‍यावर छत मारून घोड्याचा तबेला केला आहे. गणेश तलावाच्या दुरवस्था आणि तलाव सुशोभीकरणच्या नावाखाली खर्च करण्यात आलेल्या कोट्यावधी रूपये निधीचा विशेष शासन समिती मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.



मिरज सुधार समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष असिफ निपाणीकर, समन्वयक शंकर परदेशी, उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, वसीम सय्यद, राजेंद्र झेंडे, संतोष जेडगे, रविंद्र बनसोडे, अभिजीत दाणेकर आदी सदस्यांनी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनात, म्हटले काही रहिवाशांनी गणेश तलावातील पायर्‍यावर छप्पर टाकून घोड्यांचा तबेला केला आहे. तसेच, या परिसरातील रहिवासी आणि खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी कचरा टाकून तलाव अस्वच्छ केल्याने गणेश तलावाचे पावित्र्य धोक्यात आले आहे.


म्हणून गणेश तलाव सुशोभिकरणाच्या नावाखाली आज अखेर खर्च करण्यात आलेल्या निधीबाबत विशेष शासन नियुक्त समिती मार्फत चौकशी करण्यात यावी, तलावाच्या स्वच्छतेबाबत एक स्वतंत्र देखरेख समिती स्थापन करावी, गणेश तलावाच्या भोवती ८ ते १० फुटी उंच संरक्षक लोखंडी जाळी करण्यात यावी, तलावाच्या सुशोभिकरणासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात यावा, आदी मागण्या मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.