Sangli Samachar

The Janshakti News

दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी आचारसंहिता शिथिल होणार ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २५ मे २०२४
दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, आचारसंहितेत शिथिलता देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या मागणीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले आहे.

राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यक असताना लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करावी, अशी मागणी करणारे पत्र राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पाठविले. त्या पत्राची दखल घेऊन दृष्काळ निवारणासाठी आचारसंहितेत शिथिलता देता येईल का, अशी विचारणा राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.


लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे शिल्लक असले, तरी राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे भीषण स्थिती लक्षात घेऊन काही अटींच्या आधारे आचारसंहिता शिथिल केली जाऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरही अशाप्रकारे आचारसंहिता शिथिल करण्यात आली होती, याकडे त्याने लक्ष वेधले.