Sangli Samachar

The Janshakti News

सांगली महापालिकेकडून ३० विना परवाना कॅफे शॉपना नोटिसा देणार !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ मे २०२४
आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणीविना परवाना कॅफे शॉपना नोटिसा देणार आहेत.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी सुरू करण्यात आली आहे. आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर व मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. दोन दिवसांमध्ये महापालिकेने ३० हून अधिक कॅफेशॉपची तपासणी पूर्ण केली आहे. 


महापालिका प्रशासनाकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तपासणी तपासणी मोहिमेला कालपासून सुरुवात झाली आहे. आज तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरातील दोन कॅफेशॉपला भेट देत तेथील अंतर्गत रचनेची तपासणी केली. याचबरोबर सदर कॅफे शॉप हे परवानाधारक आहेत किंवा नाही तसेच कॅफेशॉमध्ये अन्य कोणते गैरप्रकार घडत आहेत का याबाबतचेही सखोल माहिती या पथकाकडून घेण्यात आली. या ३० कॅफेशॉप च्या तपासणीमध्ये कॅफे शॉपना महापालिकेचा व्यवसाय परवाना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आशा विनापरवाना सुरू असणाऱ्या कॅफे चालकांना ७ दिवसाची नोटीस बजावणार आहे. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे, धनंजय कांबळे आणि कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, ७ दिवसानंतर महापालिका क्षेत्रात विनापरवाना कॅफेशॉप आढळून आल्यास अशा कॅफेशॉपवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी दिला आहे.

दरम्यान अनेक कॅफे चालक कारवाईच्या भीतीने कॅफे बंद ठेवून परागंदा झालेले आहेत. त्यामुळे या कॅफेमध्ये कोणता गोरखधंदा चालतो ? ही मंडळी कॅफे बंद ठेवून का गायब झाले आहेत ? असा प्रश्न सांगलीकरांना पडला आहे.