Sangli Samachar

The Janshakti News

महायुतीत दादांनी कमावले, भाईंनी गमावले ?



सांगली समाचार - दि ६ एप्रिल २०२४
मुंबई  - महायुतीमधील जागावाटपात शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही जागा गमावल्या आहेत, तर काही मतदारसंघात त्यांना उमेदवार बदलावे लागले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या चार जागा राखल्यात, शिवाय आणखीही एक-दोन जागा पदरात पाडून घेत महायुतीत अतिरिक्त जागांची कमाई केली आहे. अजित पवार महायुतीत उशिरा आले पण आपल्या समर्थकांना न्याय देण्यात एकनाथ शिंदेंपेक्षा यशस्वी ठरलेले सध्यातरी दिसत असल्याने दादांनी कमावले आणि भाईंनी गमावेल अशीच चर्चा राज्यभरात आहे. कोणत्याही आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाचा तिढा हा शेवटपर्यंत सुरु असतो. त्याची प्रचिती सध्या राज्यात महायुतीमध्ये दिसत आहे. मात्र या जागा वाटपाच्या वाटाघाटीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेच्या शिवसेनेपेक्षा काकणभर सरस ठरलेली आहे.

अजित दादांनी कमावले…

अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले तेव्हा रायगडचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार त्यांच्यासोबत होते. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील बारामती येथील सुप्रिया सुळे, शिरुरचे डॉ. अमोल कोल्हे आणि सातारा येथील खासदार श्रीनिवास पाटील शरद पवारांसोबत राहिले. महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांनी रायगडमध्ये सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी घोषित केली. बारामती मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे नेमके कोणासोबत असा घोळ बरेच दिवस सुरु होता. मात्र जागावाटपाच्या आधी तो मिटला आणि डॉ. कोल्हे शरद पवार गटात असल्याचे स्पष्ट झाले. विद्यमान खासदार सोडून गेला असला तरी शिरुरची जागा अजित पवारांनी आपल्या पारड्यात पाडून घेतली. येथून डॉ. अमोल कोल्हेंच्या विरोधात पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार अढळराव पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन या जागेवरही राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह निवडणुकीत कायम ठेवले. शिरुरमधून अढळराव पाटील यांनी शिंदे सेनेची साथ सोडत हातावर घड्याळ बांधले. येथेही अजित पवारच शिंदेंपेक्षा उजवे ठरले.


धाराशिव (उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ) ची अतिरिक्त जागा अजित पवारांनी मिळवली आहे. महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता होती. मात्र तुळजापूरचे माजी आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन धाराशिवच्या उमेदवार घोषित केले गेले. सातारची जागा राष्ट्रवादीची आहे. साताऱ्यात, 2009, 2014, 2019 दरम्यान, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज, विजयी झाले. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. या रिक्त झालेल्या जागेवर शरद पवारांचे मित्र आणि माजी आयएएस अधिकारी-माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी उदयनराजेंचा पराभव केला. ही जागाही राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र यंदा तिथे भाजपचे उदयनराजे भोसले यांना लढायचे असल्यामुळे या जागेच्या बदल्यात नाशिकची जागा मिळवण्यात महायुतीत राष्ट्रवादीची दादागिरी चाललेली दिसते. अजून येथून उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी आतली बातमी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ हेच येथून उमेदवार असण्याची शक्यता आहे.

याशिवाय परभणीची जागा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस लढत आलेली आहे. येथून अजित पवारांचे समर्थक राजेश विटेकर गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभेची तयारी करत होते. महायुतीत ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना देण्यात आली. जानकरांना येथून उमेदवारी देऊन अजित पवारांनी बारामतीची जागाही सुरक्षित केली आहे. जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांना शरद पवारांनी माढ्यातून महाविकास आघाडीचे उमदेवार करण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांना आघाडीत जाण्यापासून रोखत महायुतीकडून उमेदवारी देऊन अजित दादांनी खेळलेली खेळी बारामतीसाठी उपयोगाची ठरणारी आहे.

अजित पवारांनी 2019 मध्ये एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या रायगड, बारामती, शिरुर या तीन जागातर राखल्याच पण धाराशिवची अधिकची जागा मिळवली आहे. शिवाय सातारच्या बदल्यात नाशिकची पाचवी जागा मिळवतील अशी चिन्ह आहेत. परभणीमधून जानकरांना तिकीट देऊन त्यांचा इतरही जागांवर होणारा सकारात्मक परिणाम ही अजित दादांची मोठी खेळी ठरली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत अजितदादांनी जागावाटपातच खरी कमाई केली आहे.

भाईंनी गमावले…

शिवसेनेत बंडखोरी करुन एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत युती केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेच्या 18 पैकी तब्बल 13 खासदारांनी त्यांना साथ दिली. त्याचेवळी एकनाथ शिंदेंनी सोबत आलेल्यांपैकी एकही खासदार पडला तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईल अशी प्रतिज्ञा केली होती. त्याची आठवण आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, अॅड. अनिल परब आणि खासदार संजय राऊत वारंवार करुन देत आहेत.

महायुतीच्या जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. त्यांच्या जागा वाटपावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण समोर आले ते विदर्भातील रामटेकमधून, आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्वतःच्या मुलाची, विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची उमेदवारी अजून जाहीर करता आलेली नाही. स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधामुळे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारीत डावलण्यात आले. दुसरे बळी ठरले हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील. यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी मोदींना राखी बांधूनही त्यांच्या राज्यातील भाईंनी अर्थात एकनाथ शिंदेंनी त्यांचे उमेदवारीचे ताट रिकामे ठेवले.

नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला. 2014, 2019 सलग दोनवेळा खासदार राहिलेल्या हेमंत गोडसेंना उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्तीप्रदर्शन करावे लागले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी नाशिकमध्येच त्यांच्या उमेदवारीची घोषणा केलेली. तिच आता त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा आहे. ही जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. ज्यांच्या विरोधात दोन वेळा निवडून आले त्यांचाच प्रचार करण्याची वेळ हेमंत गोडसेंवर येण्याची शक्यता आहे.

मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. सहा मतदारसंघांपैकी फक्त दक्षिण-मध्य मुंबईतून राहुल शेवाळींची उमेदवारी शिंदेंनी जाहीर केली आहे. एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासोबत असलेल्या 13 जागांवर आग्रही राहण्याऐवजी त्यांच्याकडे नसलेल्या दक्षिण मुंबई, ठाणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागांसाठी आग्रह धरला. यामुळे आहे त्या जागा गमावण्याची नामुष्की एकनाथ भाईंवर आली.