Sangli Samachar

The Janshakti News

आयटीआर दाखल करण्यासाठी घाई का करू नका !



सांगली समाचार -  दि ६ एप्रिल २०२४
मुंबई  - मूल्यांकन वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तीन दिवसात जवळपास २३ हजार करदात्यांनी त्यांचे प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरले आहेत. प्राप्तिकर विभागाने मूल्यांकन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ एप्रिल २०२४ पासून आपल्या पोर्टलवर विवरणपत्र भरण्याची सुविधा सुरू केली आहे. गेल्या वर्षी विवरणपत्र लवकरात लवकर भरण्यास सांगण्यात आले होते. परंतु ते मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी मे महिन्यात आयटी पोर्टलवर भरण्यासाठी उपलब्ध झाले होते. आयटीआर दाखल करण्याची खिडकी उघडली असली तरी त्यात घाई न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. कारण समजून घेऊ यात.

२० मे २०२३ पासून पगारदार व्यक्तीला ITR-1 भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती, ज्यांचे पगार, मालमत्ता, व्याज आणि कृषी उत्पन्न यासह एकूण उत्पन्न ५० लाखांपर्यंत आहे, अशा लोकांना हा फॉर्म भरावा लागतो. दुसरीकडे तुमचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुमचे उत्पन्न कलम ४४ एडी, ४४ एडीए किंवा ४४ एडीईमध्ये गणना केल्यानुसार व्यवसायातून येत असल्यास अशी व्यक्ती किंवा भागीदारी फर्म यांना ITR-4 फाइल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. तसेच व्यवसायातील नफा किंवा उत्पन्नाव्यतिरिक्त इतर माध्यमातून उत्पन्न येणाऱ्या व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांतील व्यक्तींना ३० मेपर्यंत ITR-2 दाखल करता येऊ शकतो. 

यंदाच्या वर्षासाठी कोण आयटीआर दाखल करू शकेल ?

प्राप्तिकर विभाग केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अंतर्गत काम करतो. विशेषतः वापरल्या जाणाऱ्या ITR-1, ITR-2 आणि ITR-4 फॉर्म भरणाऱ्यांसाठी कार्यक्षमता वाढवण्यात आली आहे. https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/login वर तुम्हाला रिटर्न भरता येणार आहे. संबंधित विभागानुसार, ई फायलिंग संकेतस्थळावर १ एप्रिल २०२४ पासून ITR-1, ITR-2 आणि ITR-4 हे फॉर्म रिटर्न भरण्यासाठी उपलब्ध आहेत. साधारणपणे करदाते त्याचा वापर करतात. १ एप्रिलपासून कंपन्या ITR 6 द्वारे त्यांचा ITR दाखल करू शकणार आहे. तसेच ITR 3, 5 आणि 7 दाखल करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. अलिकडच्या वर्षांत ही पहिलीच वेळ आहे की, करदात्यांना नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांचे विवरणपत्र भरणे शक्य झाले आहे.

आयटी रिटर्न त्वरित भरावे का ?

कर विभागाच्या आकडेवारीनुसार, मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी ३ एप्रिलपर्यंत २२,५९९ रिटर्न भरले गेले आहेत. यापैकी मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी २०,८६८ रिटर्नची पडताळणी करण्यात आली आहे. २,९०७ पडताळणी झालेल्या ITR वर प्रक्रिया करण्यात आली आहे. वार्षिक माहिती विधान (AIS) आणि फॉर्म 26AS मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच ३१ मार्च २०२४ पर्यंत अद्ययावत करण्यात आलेले नाहीत. त्यामुळेच विसंगती टाळण्यासाठी उशिराने कर भरणाऱ्या करदात्यांनी त्यांचे कर रिटर्न अंतिम करण्यापूर्वी AIS आणि फॉर्म 26AS तयार होण्याची प्रतीक्षा करणे सोयीचे ठरणार आहे.

AIS आणि फॉर्म 26AS म्हणजे काय ?

वार्षिक माहिती विधान हे फॉर्म 26AS मध्ये नोंदवल्याप्रमाणे करदात्याच्या आर्थिक व्यवहारांचा सारांश असतो. त्यामध्ये शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड व्यवहारांच्या संदर्भात व्याज, लाभांश आणि इतर तपशीलांसह स्रोत (TDS/TCS) कपात केलेल्या किंवा गोळा केलेल्या सर्व करांचा तपशील असतो. प्राप्तिकर रिटर्न भरताना AIS आणि फॉर्म 26AS द्वारे करदात्याला तपशीलवार सारांश उपलब्ध करून दिला जातो. तो अचूक असल्यास करदाता स्वीकारू शकतो किंवा त्यात काही त्रुटी असल्यास तो संबंधितांना कळवू शकतो.