Sangli Samachar

The Janshakti News

शिव्यांच्या झाल्या ओव्या; कार्यकर्ता म्हणतो गाऊ कशा ? मनधरणी करताना नेत्यांंची होतेय दमछाक



सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
मुंबई - नेत्यांनी तर निर्णय घेतले; पण युत्या आणि आघाड्यांचा झालेला झांगडगुत्ता अजूनही सामान्य कार्यकर्त्यांच्या डोक्यात घुसलेला नाही. गेल्या निवडणुकीत ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्या ओव्या गायची कल्पना कार्यकर्त्यांना सहनच करता येत नाही. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांना विशेषतः लोकसभेच्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांचे मनोमिलन करता करता नाकी नऊ आले आहेत. आपला कार्यकर्ता सांभाळायचा की नव्या मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यांना गोंजारायचे? दोन्ही बाजूने मरण, अशी अवस्था या उमेदवारांची होताना दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढले.
भाजपाने शिवसेनेसोबत युती केली होती. विधानसभादेखील याच पध्दतीने लढली. मात्र निकालानंतर राज्याचे राजकारण ३६० डिग्रीमध्ये फिरले. राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसने एकत्र येत महाआघाडीचे सरकार स्थापन केले. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सोबतचा भाजप विरोधी बाकावर बसला.

कोरोनाचा कठीण काळ संपला. दोन-एक वर्ष झाली असतील. सामान्य कार्यकर्ता आता कुठे महाआघाडी पचवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात भाजपने महाआघाडीचा सर्व गेम पलटी करुन टाकला. भाजपने एकनाथ शिंदे यांनाच फोडून मुख्यमंत्री केले. उध्दव ठाकरेंचा टांगा पलटी करुन घोडे फरार झाले होते.  राज्यात या नव्या युतीचे सरकार आले होते. भरीस भर म्हणजे भाजपने राष्ट्रवादीच्या अजित पवारांनाही सत्तेत सहभागी करुन घेतले. नव्या महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांच्या गळाभेटी घेऊन कार्यकर्त्यांना एकत्र येण्याचा मेसेज देण्याचा प्रयत्न केला.


नव्या महायुतीलाही दोन वर्षे होत आली. अनेक वर्षे परस्पर विरोधी नेते एकत्र फिरताना दिसू लागले. शिव्यांची झाली फुले...असेच काहीसे शब्द त्यांचे टपकू लागले. मात्र यात स्थानिक कार्यकर्त्यांची घुसमट संपत नव्हती. कुठलेही भांडण नसताना, केवळ नेता आणि पक्षाच्या पे्रमापोटी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर वर्षांनुवर्षे वैर पाळलेला कार्यकर्ता एका फटक्यात, नेत्यासारखी थुंकी बदलायला अजूनही तयार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आठवडा लोटला तरी कार्यकर्ता पेटल्याचे दिसत नाही.रायगड आणि मावळमध्ये सारखीच परिस्थिती आहे. रायगडमध्ये या लोकसभेला खा. सुनिल तटकरे यांचे काम शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप कार्यकर्त्यांना करायचे आहे. तर अनंत गीते यांचे काम कॉंग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना करायचे आहे. मावळमध्येदेखील जवळपास सारखेच आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या हातात हात घालून खा. श्रीरंग बारणे यांचे काम करावे लागणार आहे. तर शिवसेनेचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे काम कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांना करायचे आहे.

महायुतीमध्ये तर आठवड्यापूर्वीपर्यंत स्थानिक पदाधिकारी शिव्या शाप देत होते. एकमेकांना आव्हान देत असल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्यासाठी एकत्र मेळावेदेखील काही पक्षांनी घेतले. परंतू तरीही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जुना राग दिसतोय. त्यामुळे पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कार्यकर्त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे सर्व करताना उमेदवारांची दमछाक होत आहे.निवडणूक सुरु झाली आहे. मतदानाचा दिवस जवळ येईल तसातसा कार्यकर्ता चार्ज होईल. मात्र या निवडणुकीत कोणता कार्यकर्ता कोणत्या नेत्यावर, पक्षावर राग काढील, हे सांगणे कठीणच दिसत आहे.