सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
पाटण - भाजपचे सरकार दबाव तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात करून विरोधी पक्षांना वेठीस धरत आहे आहे. मागील निवडणुकीत दिलेल्या वचनाची पूर्तता करता येत नाही. काँग्रेस पक्षाला दंडाची नोटीस काढली आहे. पक्षाचे उत्पन्न जेवढे नाही त्याहून अधिक दंड ठोठावला आहे. देशात आताचे वातावरण पाहून नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे,'' असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केला.
''केंद्रात भाजप सरकार परत सत्तेवर आले, तर लोकशाही आणि राज्य घटना जिवंत राहणार नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आपण सर्वांनी एकत्र येऊन शरद पवार जो उमेदवार देतील त्याचे काम एकजुटीने करूया. आपल्यातील मतभेद विसरून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी एकदिलाने काम करूया,'' असे आवाहनही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
काळोली येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मेळाव्यास माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, डॉ. भारत पाटणकर, हिंदूराव पाटील, हर्षद कदम, नरेश देसाई, शंकरराव गोडसे, सुरेश जाधव, सुरेश पाटील, अजित पाटील चिखलीकर, पाटणच्या नगराध्यक्षा मंगल कांबळे आदी उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, ''अच्छे दिन, १५ लाखांचे आमिष, युवकांना नोकऱ्या, शेतकरी उज्ज्वल योजना याची पूर्तता या सरकारला करता आलेली नाही. पुन्हा हे निवडून आले, तर ही निवडणूक शेवटची असेल.''
सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, ''भाजप सरकारच्या विरोधात मोहीम सुरू आहे. केंद्राचे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न ग्रामीणस्तरावरही आहेत. तालुक्यातही सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हीच परिस्थिती आहे. संघर्ष आम्हाला नवीन नाही. तालुक्यात काम करत असताना आम्ही प्रसिद्धी कमी, काम जास्त करतो. राजकारण करत असताना भांड्याला भांडं लागले असेल; परंतु आताच्या येणाऱ्या निवडणुकीत एकत्रित येऊन संघर्ष करत लढा द्यायचा आहे.''
आमदार पाटील म्हणाले, ''देशात भयंकर परिस्थिती आहे. शासकीय यंत्रणेच्या वापर करून दबावतंत्राद्वारे लोकांना, पक्षांना, राजकीय पदाधिकाऱ्यांना आपलेसे केले जात आहे. लोकसभा हे मोठे आव्हान असले, तरी सर्वांनी एकत्र येऊन शरद पवारांच्या निर्णयाला खंबीर साथ देऊयात.'' डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ''इंडिया आघाडीच्या १७ उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार आहोत. देशात परिस्थिती विदारक आहे. आताचे सरकार जातीय व्यवस्थेवर चालणारे आहे. हे सरकार मोदींचे नाही तर अदानी, जातीयवाद, 'आरएसएस'चे सरकार आहे.'' या वेळी सुनील माने, शिवसेना (उद्धव ठाकरे) जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
पिता- पुत्राच्या अनुपस्थितीची चर्चा
महाविकास आघाडीच्या मेळाव्याला विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील व त्यांचे पुत्र सारंग पाटील यांची अनुपस्थिती होती. दोघांचीही अनुपस्थितीची कार्यकर्त्यांत चर्चा होती.