सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
सांगली - गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवत असून, एप्रिल व मे महिन्यात ती आणखी वाढणार आहे. वाढत्या तापमानामुळे थंड पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या माठांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. फिरत्या विक्रेत्यांबरोबरच रस्त्याच्या कडेला थाटलेल्या दुकानांमध्ये माठ खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
उन्हाचा पारा ३८ अंश सेल्सिअसवर गेला असल्याने उन्हाचे चटके चांगलेच जाणवत आहेत. फ्रिजचे थंड पाणी पिणे आरोग्यास बाधक असल्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिक माठातील थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतात. मागणी वाढल्याने माठांच्या किंमतीतही वाढ झाल्याने सर्वसामान्यांना या दर वाढीचा फटका बसत आहे. परिणामी नैसर्गिक थंड पाण्यासाठी नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. मातीच्या मडक्यातील पाणी शरीरासाठी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने अनेकजण फ्रिजऐवजी माठातील नैसर्गिक थंड पाणी पिणे पसंत करतात, कारण पाणी माठात त्यात ठेवल्यास त्यात नैसर्गिक मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजे असतात, त्यामुळे शरिरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. उष्माघात होण्यापासून बचाव होतो.
माठ नैसर्गिकरीत्या पाणी थंड ठेवतो. उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे आरोग्यास हितकारक असते. काळाच्या ओघात पाणी साठवणुकीची साधन बदलली असली तरी मातीचे माठ बाजारात दाखल होताच ते ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या माठ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. यामध्ये सिरॅमिक, माती व राजस्थानी माठांसह काळ्या मातीच्या माठांना मोठी मागणी आहे.