सांगली समाचार - दि. १ एप्रिल २०२४
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर देशभरात प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे. या दरम्यान, निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांसाठी नियम लागू केले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांकडे एक लाखापेक्षा अधिक रोख रक्कम असता कामा नये, असा नियम लागू केला आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही पक्षाचा उमेदवार आपल्या खिशात 50 हजार आणि त्याचा प्रचार करणारा स्टार प्रचारक आपल्याकडे एक लाखाहून अधिक रोख रक्कम ठेवू शकत नाही. जर त्याच्याकडे या रकमेपेक्षा जास्त रक्कम आढळली, तर कारवाई करण्यात येईल असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
आयोगाने हेही स्पष्ट केलं आहे की, उमेदवाराला रोजच्या खर्चासाठी एक वेगळं रजिस्टर ठेवून त्यात नोंद करावी लागेल. ती नोंद दररोज निवडणूक आयोगाला पाठवावी लागेल. या रजिस्टरमध्ये उमेदवाराने कुठे आणि किती रॅली केल्या, त्याला किती खर्च आला याचा हिशोब ठेवावा लागेल. तसंच, त्या हिशोबाला सिद्ध करण्यासाठी संबंधित व्हिडीओ रेकॉर्डिंगही करावं लागेल. तसंच, यात लागणारे फुलांचे हार, ढोलताशे, नाचगाण्याच्या पार्ट्या, वाहनांचे दर इत्यादी गोष्टींचा हिशोबही निवडणूक आयोगाला सादर करावा लागेल, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.