Sangli Samachar

The Janshakti News

मौखिक कर्करोगाला प्रतिबंध कसे कराल ?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२९ एप्रिल २०२४
तोंडाचा कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे जो प्रगत अवस्थेत पोहोचेपर्यंत त्याचे निदान होत नाही. तोंडाच्या कर्करोगाच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे तंबाखूचा वापर, धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सुपारी, खायचे पान , कात आणि चुना यांनी देखील तोंडाचा कर्करोग होतो. अनुवांशिक, पर्यावरणीय आणि जीवनशैलीसंबंधीत घटक हे देखील कर्करोगास कारणीभूत ठरतात.

तळेगाव सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरचे डॉ. जयपालरेड्डी पोगल म्हणतात. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये असलेल्या रसायनांनी तोंड आणि घशातील पेशींना हानी पोहोचू शकते, ज्यामुळे कालांतराने कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

रोजच्या जीवनशैलीत करा बदल

या जीवघेण्या कर्करोगामागील आणखी एक कारण म्हणजे अति प्रमाणात केले जाणारे मद्यपान. मद्यपान आणि तंबाखूमुळे तोंडातील ऊतींना त्रास होतो आणि पेशींच्या वाढीमध्ये असामान्य बदल होतात आणि शेवटी तोंडाचा कर्करोग आढळून येतो. तोंडामध्ये असणाऱ्या धार धार दातांमुळे/कवळीमुळे सुद्धा तोंडातील पेशींना त्रास होऊन कॅन्सर होण्याची संभावना असते.

तोंडाच्या कर्करोगाची काही सामान्य लक्षणे कोणती ?

सतत तोंडात फोड येणे, तोंड किंवा ओठांना जखम जी भरत नाही.

तोंडातील रक्तस्त्राव तसेच गिळण्यास किंवा चघळण्यास त्रास होतो.

आवाजात बदल होणे.

दात आपोआप सैल होऊन पडणे

दात काढल्यानंतर न भरणारी जखम होणे

तोंडामध्ये पांढऱ्या किंवा लाल रंगाचे चट्टे येणे जे कधीच जात नाही.

तोंडामध्ये सारखी लाळ जमा होणे

रोगाच्या यशस्वी उपचारांच्या परिणामासाठी वेळीच निदान होणे आवश्यक आहे. निदानानंतर त्वरीत उपचार करणे देखील तितकेच अत्यावश्यक आहे जे कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि तुम्ही नक्कीच तोंडाच्या कर्करोगाशी लढा देऊ शकाल.

मौखिक कर्करोगाला कसा प्रतिबंध कराल?

कोणत्याही स्वरूपात तंबाखूचा वापर बंद करा. तुम्ही तंबाखू चघळत असाल किंवा गुटखा खात असलात तरी ते तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण ठरु शकते.

धुम्रपान (सिगारेट, बिडी, पाईप किंवा हुक्का) हे तोंडाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात.

सुपारी, खायचे पान, कात आणि चुना यांचा वापर टाळावा.

नियमित दंत तपासणी करा. तोंडामधील कोणताही बदल ही तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात. मौखिक आरोग्य राखण्यासाठी सक्रिय पावले उचलून, तोंडाचा कर्करोग वेळीच ओळखण्याची आणि त्यांचे एकूण रोगनिदान सुधारण्याची शक्यता वाढवू शकते.

कोणतेही व्रण, रक्तस्त्राव असलेल्या भागात, असामान्य जखम किंवा सूज तपासण्यासाठी तुमच्या मौखिक आरोग्याची तपासणी करायला विसरु नका. हे कर्करोगाचे वेळीच निदान करु शकतात.