Sangli Samachar

The Janshakti News

महावितरण ग्राहकांच्या सेवेस येणार "AI"



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२९ एप्रिल २०२४
'वेलकम टू महावितरण, आय ॲम ऊर्जा. हाऊ कॅन आय हेल्प यू टुडे'. तक्रार करण्यापूर्वीच महावितरणकडून तुम्हाला असा संदेश मिळाल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. कारण महावितरणने आपल्या ग्राहकांकरिता तक्रार व इतर अडचणी ऐकून घेण्यासाठी 'एआय' तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. त्यामुळेच रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने तक्रार नोंदविता येणार आहे. ही सुविधा महावितरणाने सुरू केली असल्याने ग्राहकांना तातडीने तक्रार नोंदविता येणार आहे.

ऊर्जा चॅट बॉट

विजेच्या संदर्भात ग्राहकांना अनेकदा महावितरणबाबत अडचणी येत असतात. प्रत्येक वेळी कार्यालयात जाऊन अडचणीचे निराकरण करणे शक्य होत नाही. रात्री-अपरात्री अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणेही योग्य ठरत नाही. अशावेळी कुणाला तरी प्रश्न विचारून उत्तर मिळाल्यास बरे होते. वीज ग्राहकांची ही अडचण लक्षात घेऊन महावितरणने 'ऊर्जा, चॅट बॉट' ही एआय तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरू केली आहे.

येथे साधता येणार संवाद

वीज ग्राहकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी महावितरणने एआय तंत्रज्ञानाची 'चॅट बॉट' सेवा www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. लवकरच ती मोबाईल फोन अप्लिकेशनवरहील उपलब्ध होणार आहे.

कोणत्या तक्रारींचे होऊ शकते समाधान

विजेसंदर्भात तक्रार नोंदणी, घरगुती, व्यावसायिक, कृषी आणि औद्योगिक वीज जोडणीची मागणी, नवीन वीज जोडणीच्या सध्याच्या अर्जाची स्थिती, वीजबिल कॅल्क्युलेटर, ग्रो गीन नोंदणी आणि ऑनलाइन पेमेंटची माहिती आदी सेवांचा लाभ यात घेता येणार आहे.