Sangli Samachar

The Janshakti News

उमेदवार पैसे किंवा वस्तू वाटत असल्यास 'या' ठिकाणी करा तक्रार; जाणून घ्या काय आहे cVIGIL App?



सांगली समाचार - दि. १७  मार्च २०२४
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आचारसंहिता लागू झाली आहे. लोकसभा निवडणूक 7 टप्प्यात घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. लोकसभेच्या 543 जागांवर मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 13 मे, पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 25 मे, सातवा टप्पा 1 जूनला होणार आहे. तर 4 जूनला निकाल लागणार आहे. मात्र लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने काही उपाय योजना केल्या आहेत.

निवडणुका हिंसाचारमुक्त होण्यासाठी आणि पैशांचा गैरवापर टाळला जावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने काही नियमावलीही तयार केली आहे. गुन्हेगारी, पैशांचा अनैतिक वापर, अफवा, चुकीच्या माहितीचा प्रसार आणि आदर्श आचारसंहिता भंग ही चार आव्हानं निवडणूक आयोगासमोर आहेत. या चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने cVIGIL App लाँच केले आहेत. याद्वारे आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्यास तेथील गैरप्रकार फोटो या ॲपवर अपलोड करता येणार आहे. अथवा एखाद्या उमेदवाराच्या वतीने पैसे वाटले जात आहेत किंवा काही वस्तू वाटल्या जात आहेत, असे निदर्शनास आल्यास याची तक्रार या ॲपवर करता येणार आहे.


काय आहे cVIGIL ?

cVIGIL हे असेच एक मोबाइल ॲप आहे. या ॲपद्वारे मतदार आणि नागरिक निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी नोंदवू शकतात. उल्लंघनांमध्ये लाच देणे, मोफत वस्तु देणे, दारूच्या बाटल्या विकणे किंवा परवानगीपेक्षा जास्त वेळ लाऊडस्पीकर वाजवणे यांचा समावेश होतो. पुरावा म्हणून तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू शकता. निवडणूक आयोगाला तक्रार प्राप्त होताच लगेच कारवाई सुरू होते. तक्रारीनंतर निवडणूक आयोगाची टीम 100 मिनिटांच्या आत लोकेशन ट्रेस करुन त्या जागेवर पोहोचेल.

cVIGIL App कसे करते काम ?

युजरला निवडणुकीदरम्यानच्या गैरप्रकाराचा फोटो काढून किंवा दोन मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ॲपवर अपलोड करावा लागेल. यानंतर भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) नकाशावर स्थानाचा शोध घेईल. तक्रार सबमिट केल्यानंतर प्रत्येक रिपोर्टसाठी एक युनिक आयडी मिळेल.
तक्रार केल्यानंतर, माहिती जिल्हा नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचते आणि एका फील्ड युनिटला नियुक्त केले जातात, ज्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड आणि पाळत ठेवणाऱ्या पथकांचा समावेश आहे. ही पथके लोकेशनवर नेव्हिगेट करण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी 'cVIGIL Investigator' नावाचं मोबाइल ॲप वापरतात. एकदा फील्ड युनिटने तक्रारीला प्रतिसाद दिल्यानंतर, ते cVIGIL Investigator द्वारे रिटर्निंग ऑफिसरला फील्ड रिपोर्ट पाठवतात. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर ती तक्रार निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर पाठवली जाते आणि नागरिकांना 100 मिनिटांत परिस्थितीची माहिती दिली जाते आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

cVIGIL ॲपची आवश्यकता का आहे ?

cVIGIL ॲप निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यास मदत करते. निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेसोबत एकत्र काम करणे आवश्यक आहे, अशी या ॲपमागचा उद्देश आहे. cVIGIL ॲप कम्युनिटी पोलिसिंगप्रमाणे काम करते. हे ॲप नागरिकांना निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. निष्पक्ष निवडणुकांसाठी अधिकाऱ्यांनी जनतेसोबत मिळून काम केले पाहिजे या विश्वासावर ते आधारित आहे.

cVIGIL या ॲपचा कधी केला वापर ?

ऑक्टोबर-डिसेंबर 2018 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत cVIGIL प्रथमच वापरण्यात आला. तेव्हापासून नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये झारखंड विधानसभा निवडणुकीपर्यंत cVIGIL च्या माध्यमातून एकूण 1 लाख 71 हजार 745 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 1 लाख 27 हजार 567 म्हणजेच 74 टक्के तक्रारी वैध आढळून आल्या होत्या. तर महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीत एकूण 9,902 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 7,650 तक्रारी वैध आढळून आल्या आणि त्यांचे निराकरण करण्यात आले.