Sangli Samachar

The Janshakti News

"निवडणूक आयोग शांत महाराष्ट्र अशांत करायला निघालाय का?" प्रकाश आंबेडकरांचा सवाल



सांगली समाचार - दि. १७ मार्च २०२४
मुंबई - देशभरातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम शनिवारी जाहीर करण्यात आला. त्यानुसार लोकसभेच्या 543 जागांसाठी 19 एप्रिलपासून सात टप्प्यांत मतदान होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. या निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. लोकसभेबरोबरच चार राज्यांत विधानसभांच्या निवडणूका होणार आहेत. या घोषणेबरोबरच देशभर निवडणूक आचारसंहिताही लागू झाली आहे.

देशभरात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र यावरून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घ्यायला याठिकाणी बर्फ पडतो की दळणवळणाच्या समस्या आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे. सध्या प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर केलेले विधान चर्चेत आले आहे.


काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ? 

“महाराष्ट्रात दळणवळणाची समस्या नाही, ना कुठे बर्फ पडतोय. ना कुठे पाऊस पडतोय, मग पाच टप्पे का?, याचे स्पष्टीकरण देण्यात यावे. निवडणूक आयोग शांत महाराष्ट्र अशांत करायला निघाला आहे का? लोकसभा निवडणूक दोन टप्प्यात झाली पाहिजे,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात मी 1984 पासून इलेक्शन लढत आहे. कुठेही दंगा झालेला नाही, दगड मारायला कुठे माणूस मिळत नाही. त्यामुळे दोन टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुका पाच टप्प्यात का घ्यावा लागत आहे, याचे स्पष्टीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाने द्यावे. पहिल्या टप्प्यात राज्यातील लोकसभेच्या 24 आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 24 जागांची निवडणूक घ्यावी. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवू,” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबतच्या लोकसभा जागा वाटपाबाबत देखील भाष्य केले आहे. लोकसभेच्या जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी आम्ही समिती नेमली आहे. त्यामुळे मला याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.