Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत दादा घराण्याच्या अस्तित्वाचा लढा



सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
सांगली  - राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील गेली दोन वर्षे लोकसभेसाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेसाठी जोमाने तयारी करत असताना अचानकपणे ठाकरे गटाने १५ दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केलेल्या पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने स्वातंत्र्यापासून काँग्रेसच्या मुशीत घडलेले दादा घराणे राजकीय विजनवासात जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

सांगली लोकसभा मतदारसंघात दादा घराण्याने १९८० पासून प्रतिनिधित्व केले आहे. सन २०१४ च्या मोदी लाटेत विशाल पाटलांचे बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा पराभव करून संजयकाका पाटील खासदार झाले. त्यानंतर गेल्या वेळी म्हणजे २०१९ मध्येच कॉग्रेसतर्फे विशाल पाटील यांनी तयारी केली होती. मात्र आघाडीत सहभागी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला ही जागा देण्यात आली आणि विशाल पाटील यांनाही त्यांच्या पक्षाची ओळख घेत लढावे लागले. त्या वर्षी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार पडळकर यांच्या उमेदवारीने मतविभाजन झाले आणि चुरशीतील विशाल पाटील यांचा पराभव झाला. 


यानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरायचेच असा निश्चय करून विशाल पाटील नव्याने तयारीला लागले आहेत. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर जत, पलूस-कडेगाव या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व काँग्रेसकडे आणि तासगाव-कवठेमहांकाळचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेसचा दावा प्रबळ आहे. या वेळी प्रस्थापितांविरुद्ध असलेली नाराजी आणि दादा घराण्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती याचा फायदा उठविण्याच्या तयारीत विशाल पाटील आहेत.

राज्यात सांगली आणि नंदुरबार हे दोनच मतदारसंघ असे आहेत की, १९६२ पासून २०१४ पर्यंत सतत काँग्रेसच्या पाठीशी ठाम राहिले. या दोन मतदारसंघांत सतत काँग्रेसचे खासदार निवडून आले होते. २०१४ पासून सांगली आणि नंदुरबारमध्ये काँग्रेसची सद्दी संपली. दोन्ही मतदारसंधांमध्ये भाजपचे खासदार निवडून आले असले तरी ते मूळचे भाजपचे नाहीत. सांगलीत संजयकाक पाटील हे पूर्वीचे राष्ट्रवादीचे तर नंदुरबारमध्ये हिना गावित या राष्ट्रवादीचे माजी नेते डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या. दादा घराण्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्याने आता काँग्रेसचे नेतृत्व कोणती भूमिका घेते यावर सारे अवलंबून आहे.