Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार ? समीकरणे बदलणार



सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
सांगली - गामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आज वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली आहे. आंबेडकर यांनी वंचितची पहिली यादीही जाहीर केली आहे. सांगली लोकसभेसाठी प्रकाश शेंडगे यांनी निवडणूक लढविल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याबाबत बैठकाही झाल्या होत्या. दरम्यान, वंचितने ६ जागांसाठी महाविकास आघाडीकडे प्रस्ताव दिला होता, तर महाविकास आघाडीने ५ जागांचा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात होते. काल खासदार संजय राऊत यांनी अजूनही वंचितसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. तर आज वंचितने महाविकास आघाडीला धक्का देत आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

२०१९ च्या निवडणुकीत तीन लाखांहून अधिक मते मिळवली

मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदार संघात भाजपाकडून संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर हे उमेदवार होते. या निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांनी ५०८९९५ एवढी मते घेऊन विजय मिळवला होता. तर विशाल पाटील यांना ३४४६४३ एवढी मते मिळाली होती, तर वंचितच्या गोपीचंद पडळकर यांना तीन लाखांहून अधिक मते मिळाली होती. आता या लोकसबा निवडणुकीतही सांगली लोकसभेसाठी वंचितकडून प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आता सांगली लोकसभेची समीकरणे बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे.

सांगली लोकसभेवर ठाकरे गटासह काँग्रेसकडूनही दावा

महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. सांगली लोकसभा जागेवर काँग्रेससह ठाकरे गटानेही दावा केला आहे. कोल्हापूर लोकसभेची जागा ठाकरे गटाने सोडल्याने ठाकरे गटाने सांगली लोकसभेवर दावा सांगितला आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणाही केली आहे.

वंचित आघाडीने पहिली यादी केली जाहीर

अकोला- प्रकाश आंबेडकर
चंद्रपूर - राजेश बेले
भंडारा गोंदिया - संजय केवट
गडचिरोली - हितेश मढावी
बुलढाणा - वसंत मगर
नागपुरातून काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा