Sangli Samachar

The Janshakti News

मैत्रीपूर्ण की बंड : चार दिवसांत निर्णय - आमदार सावंतसांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
सांगली - मैत्रीपूर्ण लढत की बंडखोरी याबाबतचा काँग्रेसचा निर्णय येत्या चार दिवसांत घेतला जाईल असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांनी गुरुवारी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. दरम्यान, “लक्ष्य तो हर हाल मे पाना हे” असा संदेश देत काँग्रेसच्या उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील यांनी मैदानात उतरण्याचे संकेत ट्विटरवरील संदेशातून दिले.

सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती दिल्लीतील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालण्यात आली असून कोणत्याही स्थितीत सांगलीची जागा काँग्रेसने लढविण्याबाबत निर्णय घेण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पक्षाचे अध्यक्ष खरगे यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांकडे केले आहे. मतदारसंघावर काँग्रेसचा पारंपारिक हक्क असताना महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर केला हे आम्हाला मान्य नाही असेही या शिष्टमंडळाने वरिष्ठ नेत्यांना सांगितले असून पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्वाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे आमदार सावंत यांनी सांगितले.


याबाबत येत्या तीन दिवसांत वरिष्ठ पातळीवरून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले असून जिल्हा काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत सकारात्मकता दिसून आाली. यामुळे डॉ. कदम यांच्या नेतृत्वाखाली पुढील भूमिका निश्‍चित करण्यात येणार आहे, असेही आमदार सावंत म्हणाले. दरम्यान उमेदवारीचे दावेदार विशाल पाटील यांनी आज आपल्या एक्स ट्विटरवरून हिंदीमध्ये शायरी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये म्हटले आहे,

रोको तुझको आँधियाँ,
या जमिन और आसमान,
पायेगा जो लक्ष्य है तेरा,
लक्ष्य तो हर हाल में पाना है.

यावरून लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी त्यांनी केली असल्याचे मानले जात आहे.