Sangli Samachar

The Janshakti News

राज्यात ठाकरे-शिंदेंचे शिलेदार कुठे कुठे भिडणार ?सांगली समाचार - दि. ३० मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणूक आता हळूहळू रंगात यायला लागली आहे. कारण आता सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यातील लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. अशातच शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटानंही आपल्या अधिकृत लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तरी, आता राज्यात ठाकरे-शिंदेंचे शिलेदार कुठे भिडणार आहेत? तिथे कोण कुणाला भारी पडणार? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा...

त्यात शिवसेनेकडून म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं २८ मार्चला लोकसभा उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली. त्यात त्यांनी ८ उमेदवारांची घोषणा केली. तर तिकडे शिवसेना ठाकरे गटानंही २७ मार्चला १६ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर, आपण पाहू थेट ठाकरे आणि शिंदे यांच्यात कुठे कुठे लढत होणार आहे ते...

१. शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे

खरंतर शिर्डी लोकसभा हा २००९ पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. २००९साली ही जागा अनुसूचित जातींसाठी राखीव झाली. त्यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांनी रामदास आठवलेंचा पराभव करत शिर्डीत शिवसेनेचा भगवा फडकवला. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाऊसाहेब वाकचौरेंनी शिवसेनेची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


मग ही बाब शिवसैनिकांना खटकली. मुंबईहून ऐनवेळी आयात केलेल्या सदाशिव लोखंडेंना उमेदवारी मिळाली अन् शिवसैनिकांनी कंबर कसली अन् अवघ्या १३ दिवसांच्या प्रचारानं निवडणूक जिंकून सदाशिव लोखंडे शिर्डीचे खासदार झाले. २०१९ ला पक्षांतर्गत विरोधाला न जुमानता ठाकरेंनी पुन्हा सदाशिव लोखंडेंना संधी दिली. पण शिंदेंनी केलेल्या बंडानंतर लोखंडे शिंदेसोबत गेले अन् भाऊसाहेब वाकचौरेंनी घरवापसी केली. अन् त्यांना ठाकरेंनी यंदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत संधी दिली.

२. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर विरुद्ध प्रतापराव जाधव

खरंतर शिर्डीप्रमाणेच बुलढाणासुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. १९९८ चा अपवाद वगळता १९९६ पासून २०१९ पर्यंत बुलढाण्यावर कायम शिवसेनेचा भगवा फडकलाय. बुलढाणा मतदारसंघ जेव्हा अनुसूचित जातींसाठी राखीव होता तेव्हा तिथून तीन वेळा आनंदराव अडसूळ खासदार म्हणून निवडून गेलेत. तर २००९ पासून हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गात आला तेव्हापासून प्रतापराव जाधव सलग तीनदा खासदार म्हणून निवडून गेलेत.

पण, प्रतापराव जाधव यांना यंदा २०२४ ची निवडणूक जड जाणार असं दिसतंय. कारण इथे भाजप कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ हवा होता. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे. कारण, संकटकाळात त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. शिवाय खेडेकर पक्षाचा प्रचार करताना दिसलेत. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याऐवजी ठाकरेंनी स्वत: ठेवून घेतल्याची चर्चा आहे. पण इथे आघाडी, युतीचा धर्म पाळला गेला नाही तर हा मतदारसंघ ही चांगलाच गाजणार असल्याचं बोललं जातंय.

३. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील

राज्यातील सत्ता समीकरणं बदलल्यानंतर हिंगोलीचा मतदारसंघ महाविकासआघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे तर महायुतीत शिंदेंकडे आलाय. ठाकरेंनी इथून नागेश पाटील आष्टीकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे तर शिंदेंनी हेमंत पाटलांनाच पुन्हा संधी दिली आहे.

नागेश पाटील आष्टीकर हे हदगावचे माजी आमदार आहेत. आणि त्यांचीही २०२४ च्या लोकसभेसाठीच्या इच्छुकांच्या यादीत अग्रस्थानी नाव होतं. तसं सांगायचं झालं तर, हिंगोलीत पण शिवसेनेचं प्राबल्य जास्त राहिलंय. म्हणजे शिवसेना-भाजप युती असताना या जागेवर शिवसेनेनं निवडणूक लढवली आहे. पण आता नेमकी कोणती शिवसेना ताकदवर आहे, ते तर या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल.

४. मावळ- संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे

पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मावळ लोकसभा मतदारसंघ. खरंतर हा मतदारसंघ २००९ ला अस्तित्वात आला. २००९ पासून या मतदारसंघावर शिवसेनेचीच पकड आहे. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर तो प्रचंड चर्चेत आला. कारण, पवारांची इच्छा नसतानाही अन् कुठलीही तयारी नसताना नातू अन् अजित पवारांचा लेक पार्थ पवार हा याच मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. त्यावेळी शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंनी जवळपास २ लाख १५ लाखाच्या फरकानं पार्थ पवारचा पराभव केला होता.

पण यंदा लढत ही ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी होत असतानाच इथे श्रीरंग बारणेंविरुद्ध ठाकरेंकडून जो शिलेदार लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहे तो म्हणजे संजोग वाघेरे. एकेकाळी अजितदादांचा कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख. पण, येत्या लोकसभेत समीकरणं बदलल्यानंतर ही जागा शिवसेनेकडे जाणार म्हटल्यावर वाघेरेंनीही सावध भूमिका घेत ठाकरेंशी हातमिळवणी केली आणि त्यांचा भगवा हाती घेतला. त्यामुळे आता महायुती, महाविकासआघाडी अशी लढत असली तरी २०१९ ला लेकाला हरवल्याचा बदला अजितदादा संजोग वाघेरेला पडद्यामागून मदत करुन घेणार का? हे पाहणंसुद्धा महत्वाचं असेल.

आणि पाचवी जागा दक्षिण मध्य मुंबईची असल्याचं बोललं जातंय. जिथे शिंदे गटानं राहुल शेवाळेंना संधी दिलेली आहे. पण ठाकरेंच्या पहिल्या अधिकृत यादीत अनिल देसाईंचं नाव नाही. पण त्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे हे ५ मतदारसंघ आहेत, जिथे थेट ठाकरे अन् शिंदेंच्या शिलेदारांमध्ये लढत होणार असल्याचं बोललं जातंय. याशिवाय आणखी मतदारसंघ जसजशा उमेदवारांच्या याद्या समोर येतील तसं स्पष्ट होईल, अशी चर्चा आहे.