yuva MAharashtra सांगली भिवंडीत लढण्यावर काँग्रेस ठाम; अंतिम निर्णय रविवारी !

सांगली भिवंडीत लढण्यावर काँग्रेस ठाम; अंतिम निर्णय रविवारी !



सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
मुंबई - सांगली आणि भिवंडी हे काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ. मात्र, उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यावर अडून बसल्याने अद्याप जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे त्यांनी या जागांचा हट्ट न सोडल्यास स्वतंत्र उमेदवार देण्याबाबत काँग्रेसच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.


शुक्रवार, दि. २९ मार्च रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत राज्यातील प्रमुख नेत्यांची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हण, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम उपस्थित होते. महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले असताना, सांगली, भिंवडी आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर ठाकरे आणि पवार अडून बसले आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक बैठका होऊनही ठोस तोडगा निघालेला नाही. परिणामी या जागांवर मैत्रिपूर्ण लढत करूया, अशी भूमिका बैठकीत काही नेत्यांनी मांडली. या बैठकीचा अहवाल, तसेच मैत्रीपूर्ण लढतीसंदर्भातील मागणी, याबाबतची माहिती हायकमांडला दिली जाणार आहे.

रविवार, दि. ३१ मार्च रोजी नवी दिल्ली येथे मविआतील घटकपक्षांची बैठक होणार आहे. तेथे या जागांबाबत काँग्रेस हायकमांडकडून ठाकरे आणि पवारांशी चर्चा केली जाईल. तरीही तोडगा न निघाल्यास स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल, अशी माहिती काँग्रेस अंतर्गत सूत्रांनी दिली.