yuva MAharashtra मोदी की गॅरंटी : प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट !

मोदी की गॅरंटी : प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट !



सांगली समाचार - दि. ३० मार्च २०२४
नवी दिल्ली - देशाचे नागरी विमान वाहतूक मंत्री असताना विमान खरेदी व्यवहारात तब्बल 840 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका असलेले 'अजित पवार' गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना 'मोदींच्या गॅरंटी'मुळे क्लीन चिट मिळाली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी एअर इंडियासाठी विमान खरेदी करताना व्यवहारात घपला केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात सरकारचे 840 कोटींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र या प्रकरणाचा तपास 'सीबीआय'ने आता बंद केला आहे.

भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याच्या नावाखाली इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये घेऊन क्लीन चिट देऊन मंत्रीपद देण्याचे प्रकार घडत आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या राष्ट्रवादीवर 17 हजार कोटींच्या घोटाळय़ाचा आरोप केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनाही आता विमान खरेदी घोटाळय़ातून 'क्लीन चिट' मिळाली आहे. 'सीबीआय'कडून नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडिया एअर इंडियासाठी विमान भाडेतत्त्वावर घेण्याच्या अनियमिततेच्या आरोपांची चौकशी करण्यात आली होती. सुमारे सात वर्षे या प्रकरणाचा तपास केल्यानंतर 'सीबीआय'ने आता हा तपास बंद केला आहे. यासंदर्भात 19 मार्च 2024 मध्ये सक्षम न्यायालयासमोर क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.


असे होते प्रकरण

यूपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियासाठी केलेल्या विमान खरेदीत अनियमितता आढळली. या प्रकरणाचा भंडापह्ड होतात विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये या प्रकरणाचा तपास 'सीबीआय'ने करण्याचे आदेश दिले होते. यानुसार या प्रकरणाचा तपास सुरू होता. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्यासोबत सलगी केल्याने त्यांना क्लीन चिट मिळाली आहे. सीबीआयने प्रफुल्ल पटेल यांच्याविरुद्ध एअर इंडिया लीजिंग प्रकरणाच्या संदर्भात क्लोजर रिपोर्ट दाखल केला असून 2017 मध्ये नोंदवलेला भ्रष्टाचाराचा खटला बंद केला आहे.