yuva MAharashtra "विशाल की मशाल" सांगलीत कार्टून वॉर पेटले !

"विशाल की मशाल" सांगलीत कार्टून वॉर पेटले !



सांगली समाचार - दि. ३० मार्च २०२४
सांगली - एका व्यंगचित्रातून काँग्रेसने थेट उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवल्यानंतर वादाला तोंड फुटले. त्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघात  उमेदवारीवरून महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेनेत 'कार्टून वॉर' सुरू झाले आहे. काँग्रेस समर्थकांनी 'मशाल नको विशाल', या व्यंगचित्रातून थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट केले होते. त्याला उत्तर देताना आज शिवसेनेकडून विशाल पाटील यांच्यावरच हल्लाबोल करण्यात आला आहे. संयमाने सुरू असलेली लढाई आता आक्रमक करण्याचा प्रयत्न दोन्हीकडून सुरू झाला आहे.

दिल्लीत काँग्रेस नेत्यांना भेटून आल्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सोशल मीडियातून आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी अनेक व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून लढाईचे रणशिंग फुकले आहे. आज विशाल यांनी 'रोके तुझको आंधियाँ, या जमीन और आसमान, पायेगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल मे पाना है', असे ट्विट करत आरपारच्या लढाईची तयारी असल्याचे संकेत दिले. त्याआधी काल त्यांनी मैत्रीपूर्ण किंवा संघर्षपूर्ण सर्व लढाईला आम्ही तयार आहोत, असे सांगितले होते.


या घडामोडीत शिवसेनेकडून मात्र कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नव्हते. आम्हाला संयम बाळगायला सांगितला आहे, असे आज प्रा. बानुगडे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. एका व्यंगचित्रातून काँग्रेसने थेट उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवल्यानंतर वादाला तोंड फुटले. व्यंगचित्रात उद्धव ठाकरे भाषण करत आहेत आणि ते चंद्रहार पाटील यांची सांगलीतून उमेदवारी जाहीर करत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. त्यावेळी 'मशाल नाही विशाल', असा टोला एका प्रेक्षकाने मारल्याचे दाखवण्यात आले आहे. या व्यंगचित्राने सेना घायाळ झाली आहे. त्याची दखल जिल्ह्यातील नेत्यांनी आज घेतली आणि त्याला प्रत्युत्तर देणारे सेना स्टाईल व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले. त्यात विशाल यांच्या हाती व्यायामाचा मुदगल दाखवण्यात आला आहे. विशाल म्हणताहेत, माझा सख्खा भाऊ (प्रतीक) केंद्रात मंत्री असताना साडेतीन लाख मतांनी पराभूत झाला, मी दीड लाख मतांनी पराभूत झालो. तरी सांगलीची उमेदवारी मलाच हवी. आम्ही दोघे मुख्यमंत्र्यांचे नातू... असा त्यात उल्लेख आहे. या व्यंगचित्रात वसंतदादा पाटील यांचा फोटो शिवसेनेकडून वापरण्यात आला आहे. त्यामुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. व्यंगचित्र हे शिवसेनेची खासियत आहे. त्या कुंचल्यातून आमच्या पक्षाचा जन्म झालेला आहे. आमच्या हत्याराचा वापर आमच्यावरच करताना दहावेळा विचार करायचा, अशा शब्दांत शिवेसनेच्या एका पदाधिकाऱ्याने काँग्रेसला इशारा दिला आहे.