Sangli Samachar

The Janshakti News

लेक लाडकी योजना नेमकी काय; १ लाख रुपये कसे मिळवायचे ? अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर


सांगली समाचार  - दि. २८|०२|२०२४
मुंबई  - महाराष्ट्र विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज अर्थमंत्री अजित पवार यांनी येत्या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ कसा मिळवावा, योजना नेमकी काय, कोण पात्र असेल, अर्ज कसा करायचा? सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊयात…

या मुलींना मिळणार लाभ?

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना ही १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे. या योजनेतून तिच्या वयाच्या १८ वर्षापर्यंत टप्प्याटप्प्यानं १ लाख १ हजार रुपये मिळणार आहे, अशी तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाईल, तर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख ७५ हजार रुपये देण्यात येतील.

‘लेक लाडकी योजना’ नेमकी काय?

महाराष्ट्र सरकारची लेक लाडकी योजना ही प्रामुख्यानं गरिब कुटुंबातील मुलींसाठी आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार लेक लाडकी योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करेल. ही आर्थिक मदत मुलीचं वय १८ वर्ष होईपर्यंत सरकारकडून दिली जाईल. जे वर्ग श्रेणीनुसार वेगवेगळ्या वयोगटात दिले जातील.

मुलींना आर्थिक मदत नेमकी कशी मिळणार?

मुलगी जन्माला आल्यानंतर ५,००० रुपये
मुलगी पहिलीत गेल्यावर ६,००० रुपये
मुलगी सहावीत गेल्यावर ७,००० रुपये
मुलगी अकरावीत गेल्यावर ८,००० रुपये
मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५,००० रुपये
एकूण १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ राज्य सरकारकडून मिळणार

अशी होणार लाभार्थींची निवड?

ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये १ एप्रिल २०२३ रोजी किवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील.
एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता, पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र, त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
१ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) ही योजना लागू राहील.
लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक राहील.
लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

असा करा अर्ज?

तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे.
अंगणवाडी सेविकेकडे या अर्जाचा फॉरमॅट असेल.
यात तुमची वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाईल नंबर, अपत्यांची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तारीख, ठिकाण टाकून सही करायची आहे.
अर्ज करून झाला की अंगणवाडी सेविकेकडून पोहोच पावती घ्यायची आहे.

अर्जासोबत जोडायची कागदपत्रे

लाभार्थीचा जन्माचा दाखला
कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.)
लाभार्थीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहिल.)
पालकाचे आधार कार्ड
बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत),
मतदान ओळखपत्र
शाळेचा दाखला
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र