Sangli Samachar

The Janshakti News

सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यात महत्वाचे पाऊल !

 


सांगली समाचार  - दि. २८|०२|२०२४

सांगली - एसटीआरचा उपयोग बनावट कागदपत्रांवर घेतलेले मोबाइल कनेक्शन (सिम कार्ड) शोधून ती बंद करण्यात होतो आहे. या सॉफ्टवेअरशी निगडीत काही महत्त्वाचे पैलू जाणून घेऊयात.

फेब्रुवारी महिन्यात आर्थिक सेवा विभागाचे सचिव विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली विविध बँकांच्या अधिकार्‍यांची बैठक झाली. बैठकीदरम्यान ग्राहकांनी सायबर गुन्ह्यात गमावलेला निधी परत करण्यासाठी वित्तीय संस्थांना कृती योजना (एसओपी) तयार करण्यास सांगितले गेले. बैठकीत बनावट कागदपत्रांच्या मदतीने उघडलेली बँक खाती तसेच मोबाइल कनेक्शन हा देखील चर्चेचा विषय होता. या दरम्यान, डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने (दूरसंचार विभागाने) विकसित केलेल्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) व एमएल (मशीन लर्निंग) आधारित एएसटीआर इंजिनचे कौतुक झाले.

एएसटीआरचे काम

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) व केंद्रीय गृहखात्याने जारी केलेल्या आकडेवारीप्रमाणे देशात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बोगस कागदपत्रे देऊन मिळवलेली सिमकार्ड वेळेत निष्क्रिय केली तर पोलिसांना गुन्हेगारांच्या एक पाऊल पुढे राहता येईल आणि इथेच एएसटीआर चित्रात येते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड फेशियल रेकगनिशन सोल्युशन फॉर टेलिकॉम सिम सबस्क्राइबर व्हेरिफिकेशन सिस्टिम असे एएसटीआरचे दुसरे नाव आहे. दूरसंचार विभागाच्या हरियाणा शाखेने एप्रिल ते जुलै 2021 दरम्यान हा प्लॅटफॉर्म विकसित केल्याचे सांगितले जाते. टीएसपी अर्थात, दूरसंचार सेवा देणार्‍या कंपन्यांकडून मिळवलेल्या डेटासंग्रहात ग्राहकांची छायाचित्रे व इतर माहिती असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर करणार्‍या एएसटीआर इंजिनला टीएसपी नी पुरविलेल्या डेटा संग्रहाचा अ‍ॅक्सेस दिला जातो. हे सॉफ्टवेअर अवघ्या दहा सेकंदात करोडो चेहर्‍याच्या प्रतिमा स्कॅन करून एकसारखे दिसणारे चेहरे एकाच गटात मांडते.

फेशियल रेकगनिशन प्रक्रियेदरम्यान दोन किंवा जास्त चेहर्‍यांमध्ये 97.5 टक्के समान वैशिष्ट्ये असल्यास एएसटीआर प्रोग्राम या चेहर्‍यांना एकसारखे म्हणून चिन्हांकित करतो. त्यानंतरच्या प्रक्रियेत सॉफ्टवेअरचे अल्गोरिदम डेटाबेसमध्ये ग्राहकांच्या नावासह चिन्हांकित केलेल्या चेहर्‍यांची तुलना करते. इमेजमधील व्यक्तीची वेगवेगळ्या नावांनी सिम असल्यास सर्व माहिती काही सेकंदात हायलाइट करून दूरसंचार विभागाच्या अधिकार्‍यांकडे पुढील कारवाईसाठी पाठवली जाते.

 सध्याच्या नियमानुसार, एका आयडी प्रूफच्या साहाय्याने ग्राहकांना जास्तीत जास्त नऊ सिमकार्ड्स रजिस्टर करण्याची परवानगी आहे. एखाद्या व्यक्तीकडे नऊपेक्षा जास्त कनेक्शन असल्यास, एएसटीआर सिस्टम डुप्लिकेट कनेक्शनची माहिती चिन्हांकित करते. डेटा नमूद केलेल्या नंबरची सेवा त्वरित बंद करण्यासाठी टेलिकॉम कंपनीला पाठवला जातो. भारतात विकसित केलेल्या प्लॅटफॉर्म एएसटीआरला गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये खोटी कागदपत्रे देऊन मिळालेली लाखो मोबाइल कनेक्शन्स शोधून बंद केल्याचे श्रेय दिले जाते. एएसटीआर इंजिन हे सर्व काम अल्गोरिदम, प्रतिमा ओळखण्यासाठी (फेशियल रेकगनिशन) कंव्होल्युशनल न्यूरल नेटवर्क आणि फजी लॉजिक वापरून करते.

हरियाणा प्रथम राज्य

वर्ष 2022 दरम्यान राज्यातील मेवात दूरसंचार विभाग सर्व्हिस एरियात मोबाइल वापरत असलेल्या 100 टक्के ग्राहकांनी सिमकार्ड मिळवताना दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. एआय व फेशियल रेकगनिशनचा वापर करणार्‍या एएसटीआर प्लॅटफॉर्मने 16.70 लाख सिमकार्ड्सचा डेटा पडताळून बनावट ओळखपत्रांचा वापर करून मिळवलेल्या फोन नंबरचा संच बनविला. यावर काम करून अधिकार्‍यांनी 5 लाख सिम डिस्कनेक्ट केली. पुढील काळात पोलिसांकडून कारवाईचा पाठपुरावा करताना, मेवाडमधील अनेक सायबर क्राइम सिंडिकेटचा पर्दाफाश झाला.

गुजरातमध्ये मोठी कारवाई

सॉफ्टवेअरच्या मदतीने गुजरात पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरोधात केली मोठी कारवाई केली आहे. गेल्या वर्षी, गुजरातमधील 8.2 कोटी मोबाइल फोन (सिम) ग्राहकांच्या कागदपत्रांचे विश्‍लेषण करण्यासाठी एएसटीआरसह भारतातील सुपर कॉम्प्युटर परमचा वापर करण्यात आला. सबस्क्राइबर डेटामधील नावे, पत्ते आणि फोटोंवर विश्‍लेषण केल्यानंतर सिस्टम शंकास्पद माहिती काही सेकंदातच चिन्हांकित करते. दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, गुजरातमध्ये 2.25 लाख बेनामी सिम कार्ड मिळवण्यासाठी 15 हजार नागरिकांच्या छायाचित्रांचा आणि कागदपत्रांचा गैरवापर करण्यात आला.

या प्रणालीतून मिळवलेली माहिती कारवाईसाठी राज्य पोलिसांबरोबर शेअर करण्यात आली. गुजरात पोलिसांनी बेनामी सिम कार्ड जारी करणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश केला. गुन्हेगारांनी 45 पॉइंट ऑफ सेलचा वापर करून 9,127 बेनामी सिमकार्ड जारी केले होते. कारवाईत 13 जिल्ह्यांमध्ये 15 पोलीस अधिकारक्षेत्रांत एकूण 27 एफआयआर नोंदविण्यात आले आणि 40 लोकांना अटक झाली. कारवाईसाठी बँका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि पेमेंट वॉलेट कंपन्यांना देखील माहिती पुरविण्यात आली.

प्लॅटफॉर्मच्या वापरावर प्रश्‍नचिन्ह

दूरसंचार विभागाच्या एएसटीआरने गेल्या दोन वर्षांत 64 लाखांहून अधिक बोगस केवायसी करून मिळवलेले सिम शोधण्यात आणि ती बंद करण्यात मदत केली आहे. यात अनेक सायबर गुन्हे रोखण्यात यश मिळाले. परंतु या सॉफ्टवेअरमध्ये सुधारणेला भरपूर वाव आहे. अहमदाबाद मिररच्या पत्रकारांशी संवाद साधताना गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिस्टम बर्‍याचदा एकाच कुटुंबातील थोडेफार एकसारख्या दिसणार्‍या लोकांचे फोटो एकाच गटात ठेवते आणि त्यांचे फोन क्रमांक संशयास्पद असल्याचे टॅग करते. पोलिसांना सिस्टिमने केलेल्या अशा चुका समजून घेऊन त्या केसेस यादीतून काढून टाकाव्या लागतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, सिस्टममध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे. पण मशीन लर्निंगच्या साहाय्याने सॉफ्टवेअर दिवसानुदिवस स्वतःला सुधारत आहे. डीओटी अर्थात दूरसंचार विभागाने तंत्रज्ञान, डेटा सेफगार्ड आणि डेटा स्टोरेजसाठी अंतिम करारांची माहिती गोपनीय ठेवली आहे. याबाबत माहिती अधिकाराच्या माध्यमातून देखील नागरिकांना माहिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पारदर्शकता आणि ग्राहकांच्या डेटाचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी कोणाची, हा एक चर्चेचा विषय बनला आहे.