Sangli Samachar

The Janshakti News

कित्येक शतकांपूर्वी भारतात असे साजरे व्हायचे व्हॅलेंटाइन डे!

सांगली समाचार  दि. १०|०२|२०२४

फेब्रुवारी महिना आला की तरुणाईला वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डे चे... या व्हॅलेंटाईन डे ला नाके मुरडणारी मंडळी आपल्याकडे नवीन नाहीत. पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का ? देशात साजरा केला जाणारा व्हॅलेंटाईन डे अलीकडे आपल्याकडे साजरा करीत असले तरी ही परंपरा आपल्या भारतात शेकडो वर्षांपूर्वीही ही परंपरा साजरी केली जात होती... चला जाणून घेऊया याच परंपरेविषयी..

हिवाळा संपून वसंत ऋतू सुरू झाला, की देशात मदनोत्सव (वसंतोत्सव) साजरा करण्याची परंपरा आहे. प्रेम व्यक्त करण्याची संधी आणि नात्यात गोडवा आणणारा उत्सव अशी या उत्सवाची सनातन संस्कृतीमध्ये ओळख आहे.

सनातन परंपरेत मदनोत्सव हा शारीरिक सुखापेक्षा मनातल्या भावनांशी अधिक जोडलेला असल्याचं दिसतं. धर्मग्रंथांमध्ये प्रेम हे सहज, सोप्या आणि समर्पित स्वरूपात मांडलं गेलं आहे. मदनोत्सव किंवा वसंतोत्सव हा माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीपासून म्हणजेच वसंत पंचमीपासून सुरू होतो. हा उत्सव कामदेव आणि रती यांच्या प्रेमाला समर्पित आहे. काही जण श्रीकृष्णालादेखील हा उत्सव समर्पित करतात. भारतीय साहित्यातही अनेक ठिकाणी मदनोत्सवाचा उल्लेख आढळतो.

कालिदासांनी 'ऋतुसंहार'मध्ये मदनोत्सवाचा उल्लेख केलेला आहे. कामशास्त्रात 'सुवसंतक' आणि 'मदनोत्सव' याविषयी खूप माहिती दिलेली आहे. फार पूर्वीपासून देशभर वसंत ऋतूनिमित्त महिनाभर मदनोत्सव साजरा केला जात असे. आता हळूहळू तो नाहीसा होत आहे. 'ऋतुसंहार'मध्ये उल्लेख आहे की वसंत ऋतू येताच सुंदर स्त्रिया आपले उबदार कपडे काढून लाल रंगाची चादर पांघरून घेतात आणि हळदीने रंगवलेली पिवळी साडी नेसतात. याशिवाय, 'दशकुमारचरिता'मध्येही या उत्सवाला काम महोत्सव असं म्हटलं आहे. वसंत ऋतू येताच वातावरण बहरून जातं. यानिमित्त मदनोत्सव, कौमुदी महोत्सव किंवा वसंतोत्सव साजरा केला जात असे.

साहित्‍यामध्ये मदनोत्‍सवाचा उल्लेख
'चारुदत्त' या संस्कृत नाटकात मदनोत्सवासारख्याच एका उत्सवाचा उल्लेख आहे. या उत्सवानिमित्त कामदेवाची मिरवणूक निघत असे. 'मृच्छकटिकम्' या नाटकात वसंतसेना या मिरवणुकीत सहभागी झाल्याचा उल्लेख आहे. 'भविष्यपुराणा'त असं म्हटलं आहे, की वसंत ऋतूमध्ये कामदेव आणि रती यांच्या मूर्तींची स्थापना व पूजा केली जाते. 'रत्नावली'मध्येही मदनोत्सवाचा उल्लेख आहे. 'कुट्टनीमत'मध्ये असं म्हटलं आहे, की वेश्या आणि गणिकादेखील मदनोत्सव साजरा करत असत. 'सरस्वती कंठभरणा'मधल्या उल्लेखानुसार या दिवशी पृथ्वीवर वसंत ऋतू अवतरला होता. 'मत्स्यसूक्त' आणि 'हरि भक्तिविलास'मध्येही हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात मानला गेला आहे.

वसंत पंचमीच्या दिवशी कामदेवाने काय केलं होतं?
धर्मग्रंथांमध्ये कामभावनेला (वासना) देव मानलं गेलं आहे आणि त्याला पूज्य कामदेवाचं रूप दिलं गेलं आहे. रती ही कामदेवाची पत्नी आहे. वैष्णव अनुयायीदेखील कृष्णाच्या आध्यात्मिक रूपाला कामदेवाचा अवतार मानतात. धनुष्य हे कामदेवाचं शस्त्र आहे. त्याचे बाण फुलांचे बनलेले असतात, असं मानलं जातं. कामदेव जेव्हा एखाद्यावर बाण सोडतो तेव्हा ती व्यक्ती धुंद होते, संमोहित होते आणि प्रेमात पडते. कामदेवाचे डोळे बाणासारखे मानले जातात. म्हणजेच ज्यावर कामदेवाची दृष्टी पडते त्याचं प्रेमजीवन यशस्वी होतं. असं मानलं जातं, की वसंत पंचमीच्या दिवशी कामदेव आणि रतीने प्रथमच मानवी हृदयात प्रेम आणि आकर्षणाची भावना भरली होती.

चंद्रोत्सव नावाने चार्वाक साजरा करत होते प्रेमाचा उत्सव
चार्वाक हे भारतीय ऋषी इ. स. पूर्व 600च्या सुमारास मदनोत्सवाचं आयोजन करत होते. तेव्हा त्यांना खूप विरोध झाला होता. काही लोक राजदरबारात त्यांची तक्रार करत होते. धर्माच्या अभ्यासकांनी चार्वाकांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला; पण चार्वाकांनी कोणाचंही ऐकलं नाही. ते आणि त्यांचे अनुयायी या प्रेम उत्सवाला चंद्रोत्सव म्हणायचे. नंतर चार्वाकांचे ग्रंथ आणि दस्तऐवज नष्ट करण्यात आले. तरीही जैन आणि बौद्ध धर्मग्रंथांमध्ये त्याच्या सूत्रांचा उल्लेख आढळतो. यातून चार्वाकांविषयी बरीच माहिती पुढे आली. मराठी लेखक विद्याधर पुंडलिक यांनी चार्वाकांचा अभ्यास करून एक माहितीपर नाटक लिहिलं. कित्येक शतकांपूर्वीसुद्धा आपण व्हॅलेंटाइनसारखा प्रेमाचा उत्सव साजरा करायचो, हे या नाटकातून समोर आलं.

चार्वाकांच्या अनुयायांवरदेखील झाले होते हल्ले
विद्याधर पुंडलिक यांच्या 'चार्वाक' या नाटकात असं लिहिलं आहे, की चार्वाकांचे अनुयायी वर्षातल्या विशेष ऋतूमध्ये चंद्रोत्सव साजरा करत असत. हा उत्सव प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जात असे. तरुण-तरुणी रात्रभर एकत्र नाचत आणि गात असत. चार्वाकांच्या तत्त्वानुसार जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. म्हणूनच त्यांना 'आर्ट ऑफ जॉयफुल लिव्हिंग'चं जनकदेखील मानलं जातं. चंद्रोत्सव अनेक दिवस चालायचा. मैत्रीचं आणि आनंदाचं प्रतीक म्हणूनही हा उत्सव साजरा केला जात असे. अवंतीचे सम्राट वीरसेन यांच्याकडे चार्वाक आणि त्यांच्या अनुयायांबद्दल तक्रारी केल्या गेल्या होत्या. एवढंच नाही, तर चंद्रोत्सवादरम्यान त्यांच्या अनुयायांवर हल्लेही झाले होते. विशेष म्हणजे त्यांचे विरोधकसुद्धा गुपचूप लपून हा चंद्रोत्सव बघायचे.

आता ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही म्हणणार नाही ना ? आपण पाचशे मी त्यांचे अंधा अनुकरण करतो आहोत!...