Sangli Samachar

The Janshakti News

शिंदे गटाच्या आमदारामुळे नवा वाद ?
सांगली समाचार  दि. १०|०२|२०२४

कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण काही नवीन नाही. असा एखादा आठवडा गेला नसेल की संजय बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले नसतील. आता त्यांच्या वक्तव्याने नाही तर विद्यार्थ्यांना दिलेल्या अजब सल्ल्यामुळे ते वादात सापडले आहेत.

तुमचे आई-वडील जर संतोष बांगरला मतदान करणार नसतील तर तुम्ही दोन दिवस उपाशी राहा असं अजब सल्ला त्यानी शाळकरी विद्यार्थ्यांना दिला. आमदार बांगर त्यांच्या मतदारसंघातील लाख या गावाच्या दौऱ्यावर असताना शाळेत भेट दिली, तेव्हा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना त्यांनी हा सल्ला दिला.

कळमनुरीचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडतात. तुमचे आई वडील संतोष बांगरला मतदान करत नसतील तर दोन दिवस उपाशी राहा अशी आगळी वेगळी सूचना त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना केली. तुमचे आई वडील जर दुसऱ्याला मतदान करत असतील तर दोन दिवस जेवायचं नाही, जोपर्यंत तुमचे आई वडील संतोष बांगर यांना मतदान करत नाही तोपर्यंत जेवण करायचं नाही, असा आगळा वेगळा सल्ला त्यांनी शाळकरी मुलांना दिला.

संजय बांगर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या या सल्ल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना असा अजब सल्ला देणाऱ्या संजय बांगर यांची शाळा नेमकी कोणती असा सवालही गंमतीने विचारला जात आहे.

एका दिवसात निष्ठा बदलली

ठाकरे गटावर निष्ठा असल्याचं जाहीर करणाऱ्या संजय बांगरांनी एकाच दिवसात पलटी मारली होती. आणि आपली निष्ठा एकनाथ शिंदेंच्या पायाशी असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका चालूच ठेवली. कधी कार्यकर्त्यांना धमकावणं, तर कधी अधिकाऱ्यांना फटकावणं हे नित्यनेमाचं झालं आहे.

मोदी पुन्हा पंतप्रधान न झाल्यास भर चौकात फाशी घेईन

2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भरचौकात फाशी घेईन असं चॅलेंज आमदार संतोष बांगर यांनी दिलं आहे. याआधीही त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती. आता मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर फाशी घेईल, असं बांगर म्हणाले आहेत.

२०१९ मध्ये मी नवसाचा मोदक घेतला, आमदार झालो

या आधी हिंगोलीतील विघ्नहर्ता गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर बांगर यांनी नवसाचा मोदक घेतल्याने आमदार झाल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, 2019 ला मी मोदक घेतला होता आणि एका वर्षात मी आमदार झालो. त्यामुळे माझा नवस पूर्ण झाला होता. तर, देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुन्हा यावे यासाठी आज प्रार्थना केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी 2024 ला पुन्हा मुख्यमंत्री राहावेत यासाठी नवसाचा मोदक घेतला.