Sangli Samachar

The Janshakti News

अखेर मनोज जरांगे भानावर आले, ते शब्द मागे घेतले; दिलगिरीही व्यक्त केली

 


सांगली समाचार  - दि. २७|०२|२०२४

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. आई-बहिणीवरून बोलले असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो, असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. 'अनावधानाने माझ्याकडून ते शब्द गेले असतील, कारण माझ्या पोटात 17-18 दिवसाचं अन्न नव्हतं. उपोषणावेळी चिडचिड असते. माता-माऊली, माय-बहिणींना मी मानतो. आई-बहिणीवरून बोलणं योग्य आहे का? असा विषय त्यांनी पटलावर मांडला. आई-बहिणीवरून माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो', अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.

'सगेसोयरेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मी मागे हटू शकत नाही. त्यांना ज्या काही चौकश्या करायच्या आहेत त्या करू द्या. यंत्रणा त्यांच्या आहेत त्यांना पाहिजे तशा त्यांनी चालवू द्या. मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये सडायला तयार आहे. लढायलाही तयार आहे. मी ओबीसीतून आरक्षण आणि सगेसोयरेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय एक इंचही हटूच शकत नाही', असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं.

'आता प्रकृती एकदम व्यवस्थित आहे, 17 दिवस उपोषण केल्यामुळे त्रास झाला होता. डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रिटमेंट दिली. आणखी दोन-चार दिवस राहा म्हणाले. नेटवर्क बंद करणे, लोकांमध्ये वातावरण पसरवून देणे, काही घडलं पाहिजे ही फडणवीस साहेबांची किमया होती, पण मी असं काही घडू देत नाही. राज्य विस्कळीत आणि अशांतता होऊ देणार नाही. त्यांचा डाव हाणून पाडणार. कायमस्वरुपी सगेसोयरेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार', असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.