Sangli Samachar

The Janshakti News

मराठा आंदोलनात झालेल्या नुकसानीची माहिती संकलन करण्याचे आदेश

 


सांगली समाचार  - दि. २७|०२|२०२४

मुंबई  - मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत असतानाच, दुसरीकडे प्रशासनाकडून मराठा आंदोलनात झालेल्या नुकसानीची माहिती संकलन करण्यात येत आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून याबाबतची माहिती संकलित केली जात आहे. सध्या अधिवेशन चालू असून, यावेळी अचानक याबाबत माहिती मागून घेतल्यावर अडचणी येऊ नयेत यासाठी ही माहिती संकलित केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. 

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, सतत आंदोलन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे पडसाद अधिक उमटताना पाहायला मिळत आहे. असे असतांना आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक आणि पोलिस आयुक्त कार्यालय हद्दीत दाखल झालेल्या गुन्ह्यांची, मालमत्तेच्या नुकसानीची व कारवाईची माहिती संकलन केली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतून याबाबतची माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अंतिम अहवाल प्रशासनाकडे पाठवला जाणार

छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये 7 आणि ग्रामीण पोलीस हद्दीत 5 गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांतर्गत 273 जणांवर कारवाई सुरू असल्याची प्राथमिक माहिती सामान्य प्रशासन विभागातून देण्यात आली आहे. ज्यात शहर पोलिसांच्या हद्दीत 7 गुन्हे दाखल असून, त्यात 171 जणांवर कारवाई करण्यात आली असून, पोलिस पातळीवर तपास सुरू आहे. तसेच ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत 5 गुन्हे दाखल असून, त्यात 102 जणांवर कारवाई केली आहे. त्या प्रकरणातही तपास सुरू आहे. तर, सार्वजनिक मालमत्तेचे जिल्ह्यात नुकसान नाही. मात्र, शहरात खासगी बसेसचे नुकसान आंदोलनादरम्यान झाले आहे, अशी प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी सायंकाळपर्यंत संकलित झाली होती. तसेच जिल्ह्यात कुठे-कुठे नुकसान झाले, याबाबतच्या माहितीचे संकलन सुरू असून, अंतिम अहवाल प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे.

सरकार ॲक्शनमोडमध्ये

मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवीगाळ करत गंभीर आरोप केले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर देखील काही आरोप केले आहेत. जरांगे यांच्या याच भुमिकेमुळे सत्तधारी नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे आता सरकार ॲक्शनमोडमध्ये आल्याची चर्चा आहे. मनोज जरांगे यांच्यावर देखील बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.