सांगली समाचार - दि. १८|०२|२०२४
सांगली : मिरजेतील दोन तरूणांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीसांनी संशयावरून पकडून झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे सव्वा लाखाचे चोरीचे १७ भ्रमणध्वनी आढळून आले. गर्दीच्या ठिकाणी बेमालूमपणे भ्रमणध्वनी लंपास करत असल्याची कबुली अटक केलेल्या दोघांनी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांनी सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक निरीक्षक विक्रम पाटील यांना संशयित मिरज बस स्थानक परिसरात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी सापळा लावून अहमदअली जमीर शिकलगार (वय २० रा.इदगाहनगर) आणि वसीम उर्फ आबु बादशाह सुभेदार (वय १९ रा.संजय गांधी नगर झोपडपट्टी) या दोघांना ताब्यात घेउन झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेले १७ भ्रमणध्वनी आढळून आले. या चोर्या त्यांनी मिरज शहर व इदगाह नगर परिसरात केल्याची कबुली दिली आहे.