yuva MAharashtra रोहित पवारांची ‘बेन्टेक्स’ उपमा; पडळकरांचा पलटवार थेट शरद पवारांवर

रोहित पवारांची ‘बेन्टेक्स’ उपमा; पडळकरांचा पलटवार थेट शरद पवारांवर

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. १९ ऑगस्ट २०२५

इस्लामपूर (जि. सांगली) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे भरभरून कौतुक केले होते. त्याचवेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना ‘बेन्टेक्स’ची उपमा देत अप्रत्यक्ष चिमटेही काढले होते. या टोलेबाजीनंतर आता पडळकरांनीही प्रत्युत्तराची झोड उठवत रोहित पवारांवर तिखट हल्ला केला असून, त्यांची टीका थेट शरद पवारांपर्यंत पोहोचली आहे.

पडळकर म्हणाले, “पवार घराण्यात डुप्लिकेटपणा ओसंडून वाहतो. रोहित पवार हे त्याचेच उत्पादन आहेत. त्यांच्या आजोबांनी गेल्या पाच दशकांत ‘सोनं’ म्हणून जनतेला ‘पितळ’ विकलं आहे. त्यामुळे रोहितच्या बोलण्याला किंमत उरलेली नाही.”

ते पुढे म्हणाले, “चिंध्या झाकून सोनं विकता येत नाही; पण सोन्याच्या आड चिंध्या मात्र विकता येतात. पवारांनी हाच धंदा केला आहे. एवढंच काय, रोहित पवारांना त्यांच्या स्वतःच्या चुलत्यांनीच निवडून कसे आलात अशी विचारणा करून उघडे पाडले आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.”

रोहित पवारांची औरंगजेबाशी तुलना करत पडळकरांनी अजित पवारांच्या कुटुंबाबाबतही धोक्याची घंटा वाजवली. “औरंगजेबाने सत्तेसाठी वडिलांचा आणि भावांचा बळी दिला होता. रोहित पवारांचा तोच स्वभाव दिसतो. अजित पवार हे अजूनपर्यंत तग धरू शकले, पण त्यांच्या मुलांसाठी खरी चिंता आहे. भविष्यात रोहित पवार औरंगजेबाच्या पद्धतीने त्यांच्यावरच वार करतील, अशी शंका नाकारता येत नाही.” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, “मी पवारांना पुरून उरलो आहे. त्याबद्दल मला कुठलीच चिंता नाही. मात्र आता अजित पवारांनी स्वतःच्या पोरांची काळजी करावी,” असे पडळकरांनी जोरकस शब्दांत म्हटले.

इस्लामपूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी रोहित पवारांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचे कौतुक करताना त्यांना “भाजपचे खरं सोनं” म्हटले होते. मात्र त्याचवेळी अप्रत्यक्षपणे पडळकरांवर टिका करत, “आजकाल जिल्ह्यात काही बेन्टेक्स नेते फिरत आहेत. ते मोठ्या नेत्यांविषयी पातळी खालावलेली वक्तव्यं करतात. अशा बेन्टेक्स सोन्याचं नेमकं काय करायचं?” असा सवाल उपस्थित केला होता. याच विधानावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.