| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. २१ ऑगस्ट २०२५
कोयना, वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे नद्यांमध्ये ओढ निर्माण झाली आहे. बुधवारी पहाटेपर्यंत कृष्णा नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ तब्बल ४२ फूटांवर पोहोचली. धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणांमधून होणाऱ्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाणी गुरुवारी संध्याकाळपर्यंत ओसरल्यावर सुरुवात होईल.
विसर्गाचा तडाखा
सध्या सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग पुढीलप्रमाणे आहे – कोयना ९५,३०० क्युसेक, धोम ९,८६२, कन्हेर १०,४६८, उरमोडी ४,३६७, तारळी ३,०८५, तर वारणा धरणातून तब्बल ३४,२५७ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
प्रशासनाची धावपळ
पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका व पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. कृष्णा व कोयना नदीने इशारापातळी ओलांडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. ७ राज्यमार्ग, १५ प्रमुख जिल्हा मार्गांसह २५ हून अधिक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
नदीकाठच्या भागांत मनाई आदेश लागू करण्यात आले असून बघ्यांची गर्दी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. स्थलांतरित कुटुंबांसाठी निवारा केंद्रात निवास, भोजन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
यंत्रणांची पाहणी
पालकमंत्री चंद्रकांत पाटील सतत संपर्कात राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शिराळा तहसील कार्यालयात आढावा घेत प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्हा परिषद सीईओ तृप्ती धोडमिसे यांनी बाधित तालुक्यांना भेटी देऊन आवश्यक सूचना केल्या.
महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महापालिका वॉर रूममधून परिस्थितीचे निरीक्षण करत नागरिकांना स्थलांतराचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी नदीपात्राशेजारील विविध ठिकाणी पाहणी करून बंदोबस्त वाढविण्याचे आदेश दिले.
स्थलांतरित कुटुंबांचा तपशील
- शिराळा तालुका : २१ कुटुंबे, बाधित लोकसंख्या ८८
- वाळवा तालुका : १९ कुटुंबे, बाधित लोकसंख्या ६४
- पलूस तालुका : ३ कुटुंबे, बाधित लोकसंख्या १३ (निवाऱ्यात जनावरेही स्थलांतरित)
- मिरज ग्रामीण : ७२ जनावरे निवाऱ्यात
- महानगरपालिका क्षेत्र : ९१ कुटुंबातील ४७१ नागरिक नातेवाईकांकडे, तर २२ कुटुंबातील ९३ नागरिक महापालिकेच्या निवारा केंद्रात हलवले.
प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही अडचण आल्यास सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्ष क्रमांक ०२३३-२३०१८२० / २३०२९२५ वर संपर्क साधावा.
“सावध रहा – सुरक्षित रहा” हेच प्रशासनाचे स्पष्ट आवाहन आहे.