| सांगली समाचार वृत्त |
सांगली - गुरुवार दि. २१ ऑगस्ट २०२५
सांगली शहरातील जेष्ठ केमिस्ट व औषध व्यवसायातील प्रामाणिक आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले श्री. अण्णासाहेब सावळे यांचे दिनांक 19 ऑगस्ट रोजी, त्यांच्या वाढदिवसाच्याच दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्यातील औषध व्यावसायिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अण्णासाहेब सावळे हे जुन्या पिढीतील व्यावसायिक होते. “औषध विक्री हा व्यवसाय नसून रुग्णसेवा आहे” ही त्यांची ठाम भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या औषधालयात औषध घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाशी ते आपुलकीने वागायचे. पैशामागे कधीही न धावता, प्रामाणिकपणे आणि सच्चाईने त्यांनी आपल्या आयुष्यभर औषध व्यवसाय केला. त्यामुळे सांगलीतील असंख्य रुग्ण व त्यांचे नातेवाईक त्यांना ‘विश्वासार्ह केमिस्ट’ म्हणून ओळखायचे.
सांगलीत ज्योती ड्रग हाऊस या नावाने त्यांनी औषध व्यवसाय उभारला. औषध व्यावसायिकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी दिवंगत मनुभाई पारेख यांच्या साथीने सांगली जिल्हा केमिस्ट संघटनेत कामकाज केले. सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे ते माजी सेक्रेटरी होते, तसेच सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केले. संघटनेच्या उभारणीत व मजबुतीकरणात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
सावळे यांनी जुन्या पिढीचा अनुभव आणि नव्या पिढीचा उत्साह यामध्ये नेहमीच योग्य समन्वय साधला. नव्या पिढीतील सर्व केमिस्ट बांधवांशी त्यांनी वडिलकीच्या नात्याने वागून त्यांना मार्गदर्शन केले. संघटनेतील अथवा व्यवसायातील अनेक अडचणींवर त्यांचा सल्ला तोडगा ठरायचा. त्यामुळे ते केवळ सांगलीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे मार्गदर्शक ठरले.
औषध व्यवसाय करत असतानाच आपल्या कुटुंबाकडेही त्यांनी तितक्याच समर्पणाने लक्ष दिले. आपल्या दोन्ही सुपुत्रांना – ऋषिकेश आणि हर्षल यांना सुसंस्कृत करून त्यांच्या आयुष्यात स्थिरस्थावर करण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. व्यावसायिक जबाबदारी सोबतच कौटुंबिक जबाबदारीही प्रामाणिकपणे पार पाडणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू होता.
मला विशेष नमूद करावेसे वाटते की, डी. फार्मसी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या व्यवसायाची सुरुवात अण्णासाहेब सावळे यांच्या दुकानात प्रशिक्षण घेऊनच केली. त्यामुळे त्यांचा सहवास, मार्गदर्शन आणि शिस्त माझ्या व्यावसायिक आयुष्याला भक्कम पाया देणारे ठरले. पुढेही औषध व्यवसायातील विविध अडचणी असोत किंवा वैयक्तिक अडचणींचा प्रसंग असो, सावळे अण्णा यांनी नेहमीच मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचा शब्द हा सांगली जिल्ह्यातील संपूर्ण केमिस्ट परिवारात प्रमाण मानला जायचा. त्यांच्या अनुभवसंपन्न सल्ल्यामुळे अनेक कठीण प्रसंग सुकर झाले.
सावळे यांच्या जाण्याने केमिस्ट समाजातील एक पितामह, एक आदर्श आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांचे कार्य, प्रामाणिकता आणि सेवाभावाची परंपरा कायम स्मरणात राहील.
सांगली जिल्ह्यातील सर्व केमिस्ट बांधवांतर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली.
- रावसाहेब पाटील