| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २ ऑगस्ट २०२५
राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांना गंभीर आजारांवर उपचारासाठी दिलासा देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी सांगली जिल्ह्यात प्रभावी ठरत आहे. १ जानेवारी ते ३० जून २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ७४७ रुग्णांना तब्बल ५ कोटी ९२ लाख ९८ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. ही माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी व मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अध्यक्षा डॉ. मनीषा पाटील यांनी दिली.
या योजनेत २० प्रमुख आजारांचा समावेश असून, जिल्हा पातळीवर कक्ष स्थापन झाल्यामुळे गरजूंना अर्जासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रांची पूर्तता अधिक सुलभ झाली आहे. तसेच उपचारासाठी मान्यताप्राप्त रुग्णालयांची यादीदेखील सहज उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. अनेक कुटुंबांसाठी ही योजना नवजीवन घेऊन येत आहे.
हरिपूर गावातील एका तरुणाच्या अपघाताच्या घटनेत ही योजना किती महत्त्वाची ठरते हे स्पष्ट झाले. वॉटर पार्कमध्ये पाय घसरून गंभीर दुखापत झाल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचाराचा खर्च सहा ते सात लाखांच्या घरात सांगण्यात आला, मात्र कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने उपचारांमध्ये अडचण निर्माण झाली होती. या वेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून मार्गदर्शन घेऊन त्यांनी अर्ज सादर केला आणि एक लाख रुपयांची मदत वेळेवर प्राप्त झाल्याने रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य झाले.
तसाच एक दुसरा हृदयस्पर्शी अनुभव सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथील सव्वातीन वर्षांच्या चिमुकल्याच्या बाबतीत घडला. ऐकू न येण्याच्या त्रासामुळे त्याच्या पालकांनी राष्ट्रीय बाल आरोग्य अभियान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मदतीने पुढाकार घेतला. विशेष शिक्षिका वर्षाराणी जाधव व वैद्यकीय पथकातील डॉ. पलंगे यांनी आवश्यक मदतीसाठी मार्गदर्शन केले. या संयुक्त प्रयत्नांमधून सुमारे सात लाख रुपये मिळून आले आणि त्या आधारावर बाळावर यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली.
या दोन्ही उदाहरणांमधून स्पष्ट होते की, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्य शासनाने राबवलेली ही योजना अनेक गरजूंसाठी आशेचा किरण ठरली आहे. आर्थिक अडचणींमुळे आरोग्यसेवा दुर्लक्षित राहू नये यासाठी शासनाचा हा उपक्रम अत्यंत मोलाचा आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिक कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.