| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २ ऑगस्ट २०२५
पलूस येथील स्टेट बँकेच्या शाखेला तब्बल ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खोटे दागिने खरे असल्याचे भासवून कर्ज मिळवणाऱ्या आणि त्यासाठी सहकार्य करणाऱ्या तिघांविरोधात पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शाखाधिकारी गोरख पाखरे यांनी ही तक्रार दिली आहे.
ही फसवणूक राजेंद्र विठ्ठलराव यादव (रा. रामापूर, ता. कडेगाव) या कर्जदाराने केली असून, त्याला साथ दिल्याचा आरोप राजेंद्र शिंदे (सोने तपासणी तज्ज्ञ, रा. पलूस) आणि सुधाकर सूर्यवंशी (रा. पलूस) यांच्यावर आहे.
२०१५ साली यादव यांनी प्रथम २०४.१३ ग्रॅमचे दागिने तारण ठेवून सोनेतारण कर्ज घेतले होते. त्यावेळी शुद्धता तपासणाऱ्या राजेंद्र शिंदे यांनी दागिन्यांना २२ कॅरेट दर्जाचे प्रमाणपत्र दिल्यामुळे बँकेने यादव यांना १.९० लाखांचे कर्ज मंजूर केले. पुढील नऊ वर्षांमध्ये त्यांनी जुन्या दागिन्यांच्या आधारे जुने कर्ज फेडल्याचा दाखला देत वेळोवेळी नवीन कर्ज घेतले.
२०२४ मध्ये त्यांनी या दागिन्यांवरून दोन टप्प्यांत अनुक्रमे ४.३२ लाख व ३.२८ लाख रुपयांची रक्कम काढली. त्यावेळीही शिंदे व सूर्यवंशी यांनी दागिन्यांची शुद्धता असल्याचे सर्टिफिकेट दिले. मात्र १६ मे २०२५ रोजी नवीन कर्जासाठी अर्ज करताना बँकेने अधिकृत तज्ज्ञ मुकुंद दीक्षित यांच्याकडून तपासणी केली असता, दागिन्यांबाबत संशय व्यक्त करण्यात आला.
यादव याने त्यावेळी वैयक्तिक कामाचे कारण सांगून बँकेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. २३ मे रोजी जेव्हा त्याला पुन्हा बँकेत बोलावून प्रत्यक्ष तपासणी केली गेली, तेव्हा हे दागिने खरे नसल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकारात यादव याने खोट्या दागिन्यांच्या आधारे आणि सराफांच्या मदतीने बँकेकडून सतत कर्ज घेतल्याने स्टेट बँकेला ७.६० लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. पोलिसांनी या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फसवणुकीची योजना जुनेच दागिने वापरून
राजेंद्र यादवने एका काळात घेतलेले कर्ज फेडल्याचे भासवत तेच दागिने पुन्हा पुन्हा तारण ठेवून नवीन कर्ज घेतले. या प्रकाराला दोघे सराफ पाठबळ देत होते. सोन्याच्या दरवाढीचा फायदा घेत तारण कर्जाची रक्कमही सातत्याने वाढवण्यात आली, असे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.