| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - बुधवार दि. २० ऑगस्ट २०२५
गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक गणेश मंडळांना आता महावितरणकडून मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणी घरगुती दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना सुरक्षित वातावरणात उजळलेला उत्सव अनुभवता येणार आहे.
महावितरणने मंडप उभारणी, रोषणाई व देखाव्यांच्या कामकाजात विद्युत सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट आवाहन केले आहे. अधिकृत वीजजोडणी घेणे बंधनकारक असून त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. यामध्ये नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक संस्थेची मंडप परवानगी, पोलिस परवाना, विद्युत निरीक्षकाचे सुरक्षा प्रमाणपत्र, जोडणी अर्ज, वीजसंच चाचणी अहवाल तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकाची प्रत आवश्यक आहे. संबंधित मंडळांनी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून जोडणीसाठी अर्ज करावा.
अपघात टाळण्यासाठी मंडळांनी सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे. आकस्मिक परिस्थितीसाठी स्थानिक शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवण्याचा सल्लाही महावितरणकडून देण्यात आला आहे. याशिवाय, १८००-२१२-३४३५, १८००-२३३-३४३५ आणि १९१२ हे टोल-फ्री क्रमांक दिवसरात्र तक्रारी व सेवेसाठी उपलब्ध आहेत.
यंदाचा गणेशोत्सव प्रकाशमान आणि सुरक्षित होण्यासाठी महावितरणची ही सुविधा मंडळांसाठी वरदान ठरणार आहे.