| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शनिवार दि. २ ऑगस्ट २०२५
“महसूल विभाग म्हणजे शासनाचा कणा असून, तो केवळ शासकीय यंत्रणा नसून जनतेच्या आकांक्षा व कायद्याच्या चौकटीतील विश्वासार्ह दुवा आहे,” असे मत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी महसूल दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले. जिल्हास्तरावर आयोजित महसूल सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
हा कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी अजय पवार यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी काकडे यांनी सर्व उपस्थितांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि सांगितले की, महसूल विभागाच्या कामगिरीचा परिणाम थेट नागरिकांच्या आयुष्यावर होतो. जात प्रमाणपत्रे, मालमत्तेच्या नोंदी अशा नित्य व्यवहारातून जनतेचे भविष्य घडते. नैसर्गिक आपत्ती, टंचाई, निवडणूक प्रक्रिया अशा कठीण प्रसंगातही विभागाने खंबीरपणे काम केले आहे. विभागाच्या विश्वासार्हतेत वृद्धी होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा, नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत राहावे, अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या. उत्कृष्ट सेवेसाठी सन्मानित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी महसूल विभागाचे कार्य केवळ प्रशासकीय नसून, ते सामाजिक बांधिलकीचेही असते, असे सांगितले. नैसर्गिक संकटांपासून ते कायदा-सुव्यवस्थेपर्यंत, शासन विभाग विश्वासाने जी जबाबदारी महसूल विभागावर टाकतो, ती पार पाडण्यासाठी सर्वांनी नवतंत्रज्ञानाचा अंगीकार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले, तहसीलदार अर्चना कापसे, नायब तहसीलदार मनोहर पाटील आणि इतरांनी आपले मनोगत मांडले.
कार्यक्रमात ‘प्रकल्पग्रस्त भूखंड वाटप डॅशबोर्ड’ तसेच ‘आपत्ती व्यवस्थापनासाठी चॅटबोट’ या नव्या उपक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी निवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच महसूल विभागातील उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
गौरव प्राप्त अधिकारी व कर्मचारी
जिल्हाधिकारी कार्यालय व क्षेत्रीय अधिकारी:
सुशांत खांडेकर, डॉ. स्नेहल कनिचे, रणजीत भोसले, अजित शेलार, रंजना बिचकर, अर्चना कापसे, मनोहर नांदे-पाटील, नागेश गायकवाड.
कार्यालयीन कर्मचारी:
ताहेरा डांगे, रमेश शिंदे, प्रमोद पाटील, रोहिणी जैन, राजेश चाचे, मनोज शिरसे, बाळकृष्ण चव्हाण, प्रशांत जडे, विनायक बालटे.
इतर कर्मचारी व सहाय्यक:
खुदबुद्दीन पिंपरे, अनिल नागरगोजे, संतोष कानडे, पोपट सानप, नेताजी भोसले, रविंद्र पारधी, दीपक तोडकर, सुधीर गोंधळी, पोलीस पाटील धनंजय माने.
सेवानिवृत्त मानकरी:
शेखर परब, विलास डुबल, बाळासो बागडे, शंकर वडर, श्री. मुलाणी, सुनील कवठेकर, दिलीप लोंढे, कुमार कोलप.