| सांगली समाचार वृत्त |
सांगली - शुक्रवार दि. १ ऑगस्ट २०२५
राज्याच्या आरोग्य विभागामार्फत विविध जिल्ह्यांना अत्याधुनिक शववाहिका वितरित करण्यात आल्या आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने देखील शववाहिका उपलब्ध करून देण्याची अधिकृत मागणी सादर केली होती. त्यास प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या ताब्यातील तीन शववाहिका महानगरपालिकेच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरी दर्शवली.
महानगरपालिकेने या निर्णयास लेखी संमती दर्शवली असली, तरी विभागीय आरोग्य आयुक्त आणि परिवहन विभाग, पुणे यांच्याकडून अंतिम मंजुरी न मिळाल्यामुळे ही अत्याधुनिक शववाहिका वाहनं दोन-तीन महिन्यांपासून वापराविना उभी आहेत. तांत्रिक दृष्ट्या सक्षम असूनही ही वाहने सध्या उपयोगाच्या प्रतीक्षेत असून, त्यांचा गंजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, सांगलीतील प्रभाग क्रमांक १ आणि २ साठी सध्या वापरली जाणारी जुनी शववाहिका वारंवार बिघाडते आणि रस्त्यातच बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सेवेत तत्काळ नव्या वाहनांचा समावेश आवश्यक असल्याची ठोस गरज आहे.
यासंदर्भात माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी महानगरपालिकेला पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. "महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात या वाहनांचा त्वरित उपयोग झाल्यास नागरिकांना दर्जेदार सेवा मिळू शकते. मंजुरीप्रक्रियेस गती देऊन नवीन शववाहिकांचा वापर सुरू करावा," अशी त्यांची ठाम भूमिका आहे.