| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. १९ जुलै २०२५
विधानभवनाच्या पोर्चमध्ये दोन समर्थकांमध्ये झालेल्या वादावर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठोस भूमिका घेत कारवाईचा मार्ग स्वीकारला आहे. यासंदर्भातील सुरक्षा समितीचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर अध्यक्षांनी आमदार गोपीचंद पडळकर व आमदार जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्याच्या सूचनाही दिल्या.
या वादात सहभागी असलेल्या सर्जेराव टकले (वय ३७) आणि नितीन देशमुख (वय ४१) यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानभवनात प्रवेशाची अधिकृत परवानगी नसताना हे दोघं आत आले होते. याबाबतच्या चौकशीसह दोघांवर विशेषाधिकार भंगप्रकरण दाखल करण्यात येणार असून, प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष नार्वेकर यांनी दिली.
सुरक्षा अहवालात उघड झालेल्या घटना
१७ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी पावणेसहा वाजता विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन अभ्यागतांत जोरदार झटापट झाली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केला आणि संबंधितांना ताब्यात घेतले. चौकशीत टकले यांनी पडळकरांचे नातेवाईक असल्याचे सांगितले, तर देशमुख यांनी स्वतःला आव्हाड यांचे कार्यकर्ते म्हणून ओळख दिली.
गुन्हा दाखल; विधिमंडळाची शिस्त धोक्यात
या घटनेमुळे विधिमंडळाच्या परिसरातील शिस्त व सन्मान धक्क्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी टकले, देशमुख आणि इतर सहा-सात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, सदस्यांनी अभ्यागत आणताना विशेष दक्षता घ्यावी. त्यांच्या वर्तनाची जबाबदारी संबंधित सदस्यांवरच राहील. अशा घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
आव्हाड यांनी हात झटकला
खेद व्यक्त करताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिलं की, नितीन देशमुख यांना विधिमंडळात प्रवेश देण्याची कुठलीही शिफारस त्यांनी केली नव्हती. घटना घडली त्यावेळी ते परिसरातही नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भावना मांडताना म्हटलं की, या प्रकरणाकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये. केवळ दोन व्यक्तींमुळे संपूर्ण आमदार वर्गाची प्रतिमा डागाळली गेली असून, बाहेर ‘हे सगळे आमदार माजलेत’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
अध्यक्षांचा इशारा – प्रतिष्ठा राखा
विधानभवन हे लोकशाहीचे मंदिर असून, त्याच्या परिसरात कधीही अशा घटना घडल्या नव्हत्या. अध्यक्षांनी सर्व सदस्यांना यापुढे अनधिकृत व्यक्तींना सभागृहात आणू नये असा इशारा दिला. पडळकर आणि आव्हाड या दोघांनीही सभागृहात उभे राहत खेद व्यक्त केला आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, याची हमी दिली.