| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - शनिवार दि. १९ जुलै २०२५
शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडणारे विधान करत राष्ट्रध्वजाबाबत नवा सूर लावला आहे. "हिंदुस्थानचा खरा झेंडा तिरंगा नसून भगवा असायला हवा," असे म्हणत त्यांनी ऐतिहासिक संदर्भांच्या माध्यमातून भगव्याच्या आग्रहाची भूमिका स्पष्ट केली.
कोल्हापुरात एका आंदोलनाच्या वेळी भिडे गुरुजी बोलत होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या कार्याची आठवण करून दिली. "शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्य अंधकारात गेलं, मात्र संभाजीराजेंनी अवघ्या पावणे दहा वर्षांत पुन्हा प्रकाश पेरला," असे ते म्हणाले. संभाजीराजेंच्या क्रांतिकारी कार्याचा गौरव करत त्यांनी त्याच्या निर्घृण हत्येचा निषेधही केला.
"मराठ्यांनी केवळ महाराष्ट्र नव्हे, तर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत हिंदवी स्वराज्याचा विस्तार केला होता. १७८४ ते १८०३ या काळात लाल किल्ल्यावर भगवा झेंडा फडकला होता. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आज गरजेची आहे," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भिडे गुरुजी म्हणाले, "आपण आज स्वातंत्र्याचा आनंद घेतो, पण हे स्वातंत्र्य अपुरं आहे. आपल्याला पूर्ण चंद्र हवा — तेजस्वी, अखंड. भगव्याच्या पुन्हा प्रतिष्ठेसाठी हे उपोषण सुरू आहे आणि ते भगव्या झेंड्याच्या पुनरुत्थानानेच संपेल."
काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाचा उल्लेख करत त्यांनी असा दावा केला की, "विश्वेश्वराचे पुनरुज्जीवन आणि पाकिस्तानचा नाश हे एकमेकांशी जोडलेले आहेत. ही केवळ आंदोलनाची नव्हे, तर राष्ट्रीय चेतनेची प्रक्रिया आहे."
त्यांच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली असून, विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.