| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - शनिवार दि. १९ जुलै २०२५
मिरा-भाईंदरमध्ये हिंदी सक्तीविरोधातील मोर्चामुळे निर्माण झालेल्या गोंधळानंतर राज ठाकरे यांनी थेट मैदानात उतरत आज तीव्र भाषेत आपली भूमिका मांडली. मराठी भाषेच्या अपमानाविरोधात ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत त्यांनी परप्रांतीयांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना ठाम शब्दांत इशारा दिला.
“आम्हाला कोणत्याही भाषेविरोधात आकस नाही, पण जर मराठी भाषेला दुय्यम मानायचा प्रयत्न झाला, तर त्याचा प्रत्युत्तरही तितक्याच जोरात दिला जाईल,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. मिठाई दुकानदाराच्या कानफटीच्या घटनेचे समर्थन करत, त्यांनी सांगितले की, "मराठी माणसाला हिणवले तर उत्तर देताना हाताची भाषा वापरावी लागेल."
दुकानदारांना मारहाणीच्या प्रकरणावरून उठलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विचारले की, "तुम्ही किती दिवस दुकानं बंद ठेवणार? ग्राहकांनी काही घेतलं तरच तुमचा व्यवहार सुरू राहतो. आम्ही नाही तर तुमचं पोट कसं भरेल?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
हिंदी सक्तीविषयी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. “जर सरकारला हिंदी सक्ती लादून आत्मघात करायचा असेल, तर ती चूक त्यांनीच ओढवून घेतलेली समजावी,” असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला.
मुंबईवरच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ऐतिहासिक संदर्भ दिला. “गुजराती नेत्यांना मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करायचं आहे. यासाठी देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनीच पायाभरणी केली होती. आम्ही त्यांना 'लोहपुरुष' मानायचं, पण त्यांनीच मराठी अस्मितेवर पहिला घाव घातला,” अशी खरमरीत प्रतिक्रिया त्यांनी दिली. मोरारजी देसाई यांच्यावरही त्यांनी टीका करत, "त्यांच्या कारकिर्दीत मराठी जनतेवर गोळीबार झाला होता," हेही त्यांनी लक्षात आणून दिलं.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानांचा समाचार घेत ठाकरे म्हणाले, “तुमच्यामुळे मराठी माणसाला रोजगार मिळतो, असं म्हणणं म्हणजे उर्मटपणा आहे. मुंबईत आलात, तर ‘डुबो डुबो के मारेंगे’ असा संदेश तुम्हाला मिळेल,” अशा शब्दांत त्यांनी पलटवार केला.
“मराठी माणूस थांबतोय, पाहतोय... पण जर एकदा उठला, तर त्याची ताकद संपूर्ण देशाला जाणवेल,” असा गर्जनाट्यपूर्ण इशारा देत त्यांनी आपल्या भाषणाची सांगता केली.