yuva MAharashtra शारदानगरमध्ये मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न उधळून लावत नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया; हिंदू एकताचा हस्तक्षेप

शारदानगरमध्ये मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न उधळून लावत नागरिकांची तीव्र प्रतिक्रिया; हिंदू एकताचा हस्तक्षेप

             फोटो सौजन्य  : दै. ललकार 

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. १३ जुलै २०२५

शारदानगर गल्ली क्रमांक १ येथील भूखंड क्रमांक १५४/२, जो विहिरीच्या जागेसह साडेचार गुंठ्यांचा आहे, हा मूळ मालकाने प्लॉटिंग करताना सार्वजनिक वापरासाठी राखून ठेवलेला होता. मात्र, या जागेवर मुस्लिम समाजातील नदाफ कुटुंबाने शनिवारी व रविवारी, शासकीय सुट्टीच्या दिवशी, गुपचूपपणे मशिदीसाठी शेड उभारण्याचे काम सुरू केले.

स्थानीय रहिवाशांना ही हालचाल लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ महापालिकेकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले, तरी संबंधित व्यक्तींनी अधिकाऱ्यांसह नागरिकांशी वाद घालत काम सुरूच ठेवले.

ही परिस्थिती पाहता, स्थानिकांनी हिंदू एकता मंचाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पाचारण केले. मंचाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार नितीन शिंदे, नगरसेवक राजेंद्र कुंभार, मनोज साळुंखे, प्रदीप निकम, प्रसाद रिसवडे, अनिरुद्ध कुंभार आदींनी घटनास्थळी धाव घेत, महापालिकेची कोणतीही परवानगी नसताना सुरू असलेले हे बांधकाम थांबवले आणि मजूरांना जागेवरून हटवले.

त्यानंतर माजी आमदार नितीन शिंदे यांनी संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बिजली यांच्याशी संपर्क साधत, जागेची कायदेशीर स्थिती स्पष्ट केली. निरीक्षकांनी स्पष्ट सांगितले की, सातबारा उतारा व महापालिकेची बांधकाम परवानगी नसताना कोणत्याही प्रकारचे बांधकाम कायदेशीर ठरणार नाही.

माजी आमदार शिंदे यांनी सांगितले की, गेल्या तीन दशकांपासून काही मुस्लिम कुटुंबांकडून या भूखंडावर मशिदीच्या बांधकामाचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, शारदानगर परिसरात बहुसंख्य हिंदू लोकसंख्या असल्याने या प्रकाराला स्थानिक हिंदू समाजाकडून तीव्र विरोध आहे. तसेच, भूखंडाची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक असल्याने या जागेवर चुकीच्या मार्गाने ताबा मिळवण्याचा कट रचला जात आहे.

त्यांनी असा आरोपही केला की, संबंधित मुस्लिम कुटुंबाने बनावट कागदपत्रे सादर करून काही अधिकाऱ्यांना प्रभावाखाली घेऊन न्यायालयातून अनुकूल निकाल मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेने या निकालाविरुद्ध पुढील न्यायालयात अपील करावे, आणि या व्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली. हा भूखंड भविष्यात सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांसाठी विकसित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी ॲड. बाळासाहेब देशपांडे, सचिन साळुंखे, गणेश धुमाळ, योगेश जाधव, अभिजीत राणे, दत्ता पवार यांच्यासह अनेक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.