yuva MAharashtra नाराज पृथ्वीराज पाटील भाजपच्या उंबरठ्यावर; भाजपामध्येही अस्तित्वाची लढाई

नाराज पृथ्वीराज पाटील भाजपच्या उंबरठ्यावर; भाजपामध्येही अस्तित्वाची लढाई

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - मंगळवार दि. २९ जुलै २०२५

सांगलीतील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीरराज पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असून, येत्या मंगळवारी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी त्यांची महत्त्वाची भेट होणार आहे. या बैठकीत त्यांच्या पक्षप्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीपासूनच पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये जाण्याचा चर्चा रंगत होती. त्यांना भाजपची उमेदवारी मिळेल, अशी जोरदार शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्या वेळी भाजपने विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा संधी दिली आणि पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली.

या निवडणुकीदरम्यान जयश्री पाटील यांच्या बंडखोरीमुळे स्थानिक काँग्रेसमध्ये फूट पडली. पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि विरोध यामुळे पाटील यांचा भ्रमनिरास झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा भाजपशी जवळीक साधण्यास सुरुवात केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांच्या चर्चाही झाल्या आहेत.

दरम्यान, माजी मंत्री अण्णा डांगे हे बुधवारी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात औपचारिक प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ तालुक्यातील काँग्रेसचे नेते बाळासाहेब गुरव यांचाही भाजपकडे कल असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

परंतु ज्यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, त्या जयश्रीताई पाटील या भाजपमध्ये डेरेदाखल झाल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत त्यांच्या गटाला भाजपकडून झुकते माप मिळणे नक्की. याशिवाय भाजपाची महापालिका क्षेत्रात तगडी टीम कार्यरत आहे.वेळेस पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये कितपत स्थान मिळणार ? त्यामुळे जयश्रीताई पाटील यांच्याप्रमाणेच पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीमागे कॉंग्रेसमधील त्यांचा जनाधार त्यांच्या पाठीशी रहाणार का ? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.